
प्रभाग क्रमांक 8 ड मधील राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आलेले देविदास शेटे यांच्यावर पाणीपुरवठा पदाची जबाबदारी आहे. मागील अनेक दिवसांची या भागातील महिलांची तक्रार होती. सध्या उजनी जलाशयातील पाणी पुरवठ्याच्या ठिकाणी अनेक संकटे असल्याचे शेटे यांनी सांगितले. परंतु आजूबाजूच्या गल्लीतील लोकांना पाणीपुरवठा केला जातो. परंतु आमच्या गल्लीत पाणीच येत नसल्याने कोणत्याही प्रकारचे संकट नसून खोडसाळपणा करुन पाणी सोडत नसल्याचे महिलांनी म्हटले. आम्ही नगरपालिकेचा कर भरतो, आमचा हक्क असून आमच्यावर अन्याय होत असल्यास वेगळ्याप्रकारे आंदोलन करु असेही त्यांनी म्हटले.
यावेळी शेटे यांनी पाणीपुरवठा करण्यासाठी चावीवाल्याचे काम करणा-या सावळे यांना फोन करुन बोलावले. यावेळी सावळे यांनी मान खाली घातली होती. शहरातील यासारख्या अनेक भागातील तक्रारी असून चावीवाल्यांकडून सदरचे प्रकार होतात की तसे प्रकार करण्यास कोणी त्यांना सांगत आहे, हे पूर्ण अभ्यास केल्यावर समजू शकते. यापूर्वीही अशाप्रकारचे अनेक प्रकार झाले असून त्यामागे विरोधी पक्षनेते राजकारण असल्याचे सांगण्यात येत होते.
जूनपर्यंत पाण्याची चिंता नाही, अमक्या मशिनरी बसविल्या, तमक्या आधुनिक मशिनरी उभारल्या, अशा बातम्या वाचून अनेकांना आनंद झाला. परंतु एक दोन आठवडे देखील तो आनंद टिकला नसून संपूर्ण शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा विस्कटलेली आहे. अनेक ठिकाणी पाणीच पोहोचत नसून अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. काही ठिकाणी कमी वेळापुरते पाणी सोडले जाते तर काही ठिकाणी दुथडी भरुन पाणी वाहून जात आहे. सदरच्या प्रकाराने नागरिकांच्या तक्रारीत वाढ झाली आहे.