बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: आमदार दिलीप सोपल यांच्‍या राजकीय कारकिर्दीत बदल होत असून सोपलांचे अनेक स्‍नेही आपला वेगळी वाट शोधून सोपलांची साथ सोडून जात असल्‍याने सोपल यांच्‍या राजकीय वाटचालीत प्रश्‍नचिन्‍ह निर्माण झाले आहे.
    बार्शीच्‍या राजकीय इतिहासातील सोपलांचा इतिहास अभ्‍यासला तर अशोक सावळे यांची सोपलांशी असलेली मैती ही सोपलांच्‍या यशस्‍वीतेचे गमक असलेले सोनेरी पान आहे. अशोक सावळे यांनी सन 1967 पासून युवक कॉंग्रेसच्‍या माध्‍यमातून दिलीप सोपल यांच्‍यासोबत काम केले. अशोक सावळे यांचे वडील सन 1947 साली बार्शीचे नगराध्‍यक्ष होते. त्‍यांच्‍यापासून त्‍यांना राजकीय वारसा प्राप्‍त झाला आहे. अशोक सावळे हे शालेय शिक्षणातही सोपल यांचे मित्रच होते. सावळे यांना राजकीय वारसा, सामाजिक भान, लोकांच्‍या समस्‍येला निराकरण करण्‍याची कुवत असतानाही सोपल यांच्‍या राजकीय विधायक कामात त्‍यांनी एक सच्‍चा मित्र म्‍हणून साथ दिली. सोपल आणि सामान्‍य जनता यांच्‍यामध्‍ये महत्‍त्‍वाचा दुवा म्‍हणूनच अशोक सावळे यांनी सातत्‍याने काम केले. सोपल आणि त्‍यांची मैत्री टिकवून जनतेच्‍या अनेक अडचणी चुटकीसरशी सोडविण्‍यासाठी अनेकजण सोपलांऐवजी सावळेंच्‍याकडेच आपली गा-हाणी मांडत. सोपलांना न भेटताही अनेकांचे यक्षप्रश्‍न सुटल्‍यामुळे सावळेंच्‍या सामाजिक कामाची माहिती जनमानसात रुजली. सोपल यांच्‍यासोबत कोणत्‍याही व्‍यासपीठावर अत्‍यंत गमतीदार उदाहरणे सांगून लोकांचे वातावरण हलके फुलके करण्‍यात सावळेंचे नाव आठवणीत ठेवले जाते. संपूर्ण तालुक्‍यातील गाव न गाव, वाडी, वस्‍ती, गल्‍ली, रस्‍ता जमात इत्‍यादींशी सोपलांसोबत आलेला संबंध अबाधित ठेवत त्‍यांच्‍या प्रश्‍नांची वेळोवेळी आठवण काढून ती कामे करण्‍याची सातत्‍याने आठवण करुन देणारे सावळेच. बार्शी टेक्निकल हायस्‍कूल येथे इतिहासाचे शिक्षण देणारे सावळे नंतर अध्‍यापिका विद्यालयात प्राचार्यपदावर होते. राजकीय व सामाजिक आवड, पुस्‍तकांशी घनिष्‍ठ मैत्री, कलेवर प्रेम, वक्‍तृत्‍वाचा दांडगा अनुभव असलेल्‍या सावळेंनी मध्‍यंतरी मिरगणेंच्‍या सामाजिक स्‍टेजवर भाषणे ठोकली आणि माशी शिंकली. मिरगणे हे खासदारकीच्‍या निवडणुकीसाठी इच्‍छुक असल्‍याची चर्चा रंगायला सुरु झाली आणि सावळे-सोपल यांच्‍या मैत्रीला तडा गेला.
    डॉ. पद्मसिंह पाटील हे सध्‍या उस्‍मानाबादचे खासदार असून केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्‍याशी त्‍यांचा घरोबा आहे. मिरगणे यांनादेखील कोणीतरी सांगून सावळेंच्‍या सोबत कशाला, म्‍हणून कानात कुजबुज केल्‍याने सावळे यांनी आता वेगळाच मार्ग अवलंबला आहे.
    सोपल यांचे कट्टर विरोधक असलेले राजेंद्र राऊत यांच्‍यासोबत गौतम बुध्‍द जयंतीपासून नातेवाईकांचे लग्‍न समारंभ, विविध गावच्‍या यात्रा इत्‍यादीमध्‍ये सोपल यांच्‍याऐवजी राजेंद्र राऊत आणि सावळे हे समीकरण पाहून अनेकांच्‍या भुवया उंचावल्‍या. राऊत यांचे सामुदायिक नेतृत्‍व असल्‍याने त्‍यांच्‍या गटास तिस-यांदा सभापतीपद, जिल्‍हापरिषद, पंचायत समितीमध्‍ये यश मिळाले आहे. अशा नेतृत्‍वाच्‍या सोबत जाणे त्‍यापेक्षा बरे, असे त्‍यांच्‍याकडून बोलले जात असल्‍याने बार्शीची राजकीय समीकरणे बदलली आणि सोपल यांच्‍या राजकीय भवितव्‍याबाबत प्रश्‍नचिन्‍ह निर्माण झाल्‍याचे स्‍पष्‍ट दिसत आहे. नुकतचे साकतचे बाबासाहेब मोरे, महागावचे बाळासाहेब पाटील यांनी सोपलांऐवजी राऊतांच्‍या हातात हात घातल्‍याने सोपलांच्‍या राजकीय भवितव्‍य अडचणीचे झाले आहे.
 
Top