बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: बोगस प्रमाणपत्र मिळवून शासनाची फसवणूक करणा-या व अपहार करणा-या नगरपालिका शिक्षण मंडळातील पर्यवेक्षक संजय पाटील यांच्‍यावर कारवाई करण्‍याची मागणी शिक्षण मंडळातील शिक्षक, शिक्षिका व कार्यालयीन कर्मचारी यांनी लेखी निवेदनाद्वारे शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनायलय पुणे यांना केली आहे.
    सदरच्‍या लेखी निवेदनात संजय पाटील यांच्‍याविरूद्ध 14 विविध मुद्यांद्वारे माहिती विशद केली आहे. सदरच्‍या तक्रारीत म्‍हटले आहे की, संजय पाटील यांनी बार्शी जवाहर रूग्‍णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांच्‍या सहीचे बनावट अपंगत्‍वाचे प्रमाण जोडून उजवा अधू असल्‍याचे प्रमाणपत्र दिले आहे. सिव्‍हील सर्जन हॉस्पिटल सोलापूर दिले असे दाखविलेल्‍या प्रमाणपत्रात उजव्‍या पायाने अशक्‍त, लांब अंतर चालू शकत नसल्‍याचे तसेच एका जागेवर काम करु शकतात, असे नमूद केलेले बनावट प्रमाणपत्र कार्यालयात सादर करुन प्रशासनाची फसवणूक केली आहे. संजय पाटील हे कधीच अपंग नाहीत आणि नव्‍हते, त्‍यामुळे वैद्यकीय बोर्डापुढे हजर करुन तपासणी करुन त्‍यांच्‍या प्रमाणपत्रांची वरिष्‍ठ स्‍तरावरुन त्‍वरीत चौकशी करावी व तोपर्यंत पदावरुन हकालपट्टी करावी, बनावट प्रमाणपत्रे देणा-यांविरूद्ध फौजदारी गुन्‍हे दाखल करावे, रामचंद्र पवार तसे शिक्षण मंडळातील अनामिक शिक्षिका यांच्‍या अर्जाची दुस-या अधिका-यांमार्फत चौकशी करावी, संजय पाटील यांची पर्यवेक्षक पदावर नेमणूक झाल्‍यापासून विद्यार्थ्‍यांची संख्‍या घटली आहे, 2007 पासून शिक्षक अतिरिक्‍त होत आहेत, याचे प्रमुख कारण विद्यार्थी संख्‍या हेच आहे, याची संपूर्ण चौकशी करावी. संघटनेच्‍या कामकाजात सक्रीय सहभाग घेता येत नसतानाही संघटनेत सहभाग तसेच कर्मचा-यांच्‍या पतसंस्‍थेत भाग घेवून पाहिजे तसे कर्मचार दबावाने व दडपशाहीने सदस्‍यपदावर नेमणूक करीत शिक्षक व मुख्‍याध्‍यापकांना अडचण करीत आहेत. शिक्षक-शिक्षिकांना अरेरावी व एकेरी भाषेतून अपमानित करुन प्रशासन अधिका-यांपेक्षा माझ्याकडे जास्‍त अधिकारी असल्‍याचे सांगत आहेत. माझा नाद धरला तर संपूर्ण रेकॉर्ड खराव करुन तुमचे जीवन नकोस करीन, अशा प्रकारची दमबाजी करुन मानसिक त्रास दिला जात आहे.
    दि. 8 व 9 फेब्रुवारी 2013 मध्‍ये नगरपालिका तसेच खाजगी प्राथमिक शाळेच्‍या सांस्‍कृतिक कार्यक्रमाची वेळ दुपारी साडे तीनची असताना रात्री अकरापर्यंत सुरु राहिलेल्‍या कार्यक्रमात माईक हातात घेवून वायफळ बडबड करीत कार्यक्रम उशीरापर्यंत सुरु ठेवल्‍याने स्‍पर्धक, प्रमुख पाहुणे, पालक, विद्यार्थी व शिक्षकांना विनाकारण ताटकळत बसावे लागले. संजय पाटील यांच्‍यापेक्षा जास्‍त सेवाज्‍येष्‍ठता असलेल्‍या महिला शिक्षकांकडून बेकायदा जबरदस्‍तीने लिहून घेवून स्‍वतःला पद घेत कार्यभाग साधून घेतला. आंतरशालेय क्रीडा स्‍पर्धा व सांस्‍क‍ृतिक कार्यक्रमासाठी दरवर्षी नगरपालिकेकडून अनुदान मिळते तरीही दरवर्षी शिक्षकांकडून प्रत्‍येकी दीडशे रुपयाप्रमाणे बेकायदा वसुली केल्‍याचे समजते. दि. 26 ते 28 फेब्रुवारी 2013 मधील आंतरशालेय क्रीडा स्‍पर्धांचा बक्षीस वितरण समारंभात कार्यक्रम पत्रिकेत दाखविल्‍याप्रमाणे बक्षीसांचे वाटप न करता केवळ प्रमाणपत्रे दिली, याकरीता आलेले न.पा. अनुदान व शिक्षकांच्‍या गोळा केलेल्‍या वर्गणीचा हिशोब नाही. माहिती अधिकाराला दुरुपयोग करुन नाहक त्रास देणा-याविरूद्ध पोलीस कारवाई करावी, शासन निर्णयानुसार प्रशिक्षित अर्हताधारकास केंद्रप्रमुखपदी घ्‍यावे, दरमहा देण्‍यात येणारे वेतन वेळेवर मिळावे, शाळेतील भौतिक सुविधासह इमारत मिळाव्‍या, अशा तक्रारीची तज्ञ अधिकारी नेमून चौकशी करावी व अकार्यक्षम, बेजबाबदार, मनमानी वागणा-या संजय पाटील यांची पदावरुन त्‍वरीत हकालपट्टी करावी, अशी तक्रार व मागणी शिक्षक, शिक्षकतेतर कर्मचारी यांनी केली आहे. सदरच्‍या तक्रारीची चौकशी व कारवाई दि. 31 मे पर्यंत न आल्‍यास धरणे आंदोलन, मोर्चा स्‍वरुपात आंदोलन करण्‍यात येतील, असेही तक्रारीत म्‍हटले आहे. सदरच्‍या तक्रारीत 63 जणांच्‍या स्‍वाक्ष-या आहेत.
 
Top