कळंब (भिकाजी जाधव) -: कळंब शहरासह संपूर्ण उस्मानाबाद जिल्हा दुष्काळाच्या झळाने आणि उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेला आहे. भर दुपारी बाराची वेळ, अंगाची लाही लाही, जो तो प्यायला पाणी अन् सावलीचा शोध घेतोय, आपापल्या कामात व्यस्त असताना शहरातील पोलीस लाईनच्या मागे एका इमारतीत वरच्या मजलावरील अनिक फायनांन्स कंपनीच्या कार्यालयाच्या गॅलरीत अचानकपणे एक बहिर ससाना जोरदार आपटला, तो पाण्याच्या शोधात भटकत भटकत आला असल्याचे लक्षात घेऊन कार्यालयातील लेखापाल असेफ मुलानी व कार्यालय सहाय्यक लहू लोखंडे यांनी त्या पक्षाच्या जवळ जाऊन त्याला ताटात पाणी ठेवले. मात्र स्वतःचे डोके व चोच उचलण्याइतकी देखील शक्ती त्या बहिर ससान्यात राहिली नव्हती, तेंव्हा त्याची चोच हातात पकडून ताटामध्ये ठेवली व अंगावर थोडे पाणी शिंपडताच तो शुध्दीवर आला. त्याने थोडे पाणी प्राशन केले. तसेच भाकरीचे तुकडे खाल्ले, थोड्यावेळ इकडेतिकडे उडया मारल्या आणि नंतर गॅलरीतूनच थोड्या वेळाने त्याने आकाशात भरारी घेतली. भीषण दुष्काळजन्य परिस्थितीमुळे कुणी कुणाला तांब्याभर पाणी प्यायला सुध्दा धजत नाही, मात्र अनिक फायनांन्स सर्व्हिसेसच्या कार्यालयात आलेल्या बेशुध्द अवस्थेत पडलेल्या या पक्षाला जीवनदान दिल्यामुळे परिसरात या तरुणांचे अभिनंदन केले जात आहे.