नळदुर्ग -: शिक्षण, संधी व समाजभिमुख काम याचा सुयोग्‍य समन्‍वय साधून रचनात्‍मक पध्‍दतीने कार्य केल्‍यास यश समाज व गावच्‍या विकासाला गती मिळण्‍यास वेळ लागणार नाही. तेंव्‍हा सामाजिक परिवर्तनासाठी योगदान देणा-या कार्यकर्त्‍यांनी नवसमाज निर्मितीसाठी संघटीतपणे काम करण्‍याचे गरज आहे, असे मत प्रा. दत्‍ता साखरे यांनी व्‍यक्‍त केले.
    तुळजापूर तालुक्‍यातील फुलवाडी येथील कामधेनू सामाजिक संस्‍था व महात्‍मा गांधी तंटामुक्‍त गाव समितीच्‍यावतीने सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, युवक व कला क्षेत्रामध्‍ये विशेष कार्य केलेल्‍या गुणवंतांचा सत्‍कार करण्‍यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
    कामधेनू ही संस्‍था सामाजिक व सांस्‍कृतिक क्षेत्रामध्‍ये ग्रामीण भागात योगदान देत असून या संस्‍थेने शैक्षणिक क्षेत्रात पोषक ठरणारा 'बापाची शाळा' हा उपक्रम तालुक्‍यातील विविध गावामध्‍ये राबविला आहे. संस्‍थेचे अध्‍यक्ष तथा महात्‍मा गांधी तंटामुक्‍त गाव समितीचे अध्‍यक्ष बळीराम जेठे यांनी गावातील तंटे गावातच मिटवून गावची शांतता व सुव्‍यवस्‍था चांगली ठेवून गावात सामाजिक सलोखा निर्माण केला आहे.  संस्‍थेच्‍या विधायक उपक्रमाचा एक भाग म्‍हणून संस्‍थेच्‍या व महात्‍मा तंटामुक्‍त समितीच्‍या संयुक्‍त विद्यमाने विविध क्षेत्रामध्‍ये भरीव योगदान दिल्‍यामुळे प.पू. बोधिसत्‍व डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्‍यस्‍तरीय समता पुरस्‍कार मिळाल्‍याबद्दल एस.के. गायकवाड, भैरवनाथ कानडे, दयानंद काळुंके, आर.एस. गायकवाड, मारुती बनसोडे, सैफन शेख, प्रा.दत्‍ता साखरे आदींचा तर राज्‍यस्‍तरीय युवाचेतना पुरस्‍कार मिळाल्‍याबद्दल पत्रकार शिवाजी नाईक आदी मान्‍यवरांचा सत्‍कार करण्‍यात आला.
    या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी फुलवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुभाषचंद्र कुताडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणून माजी सरपंच संजय हांडगे, सरपंच वसंत जाधव, ग्रा.पं. सदस्‍य मधुकर हजारे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक संस्‍थेचे अध्‍यक्ष तथा तंटामुक्‍त समितीचे अध्‍यक्ष बळीराम जेठे यांनी तर सूत्रसंचालन दयानंद काळुंके यांनी केले व आभार अमोल हांडगे, यांनी मानले. यावेळी वसंत जाधव, शांतवीर धबाले, रेवणसिध्‍द उजने, ऊर्मिला मंकराज, शालिनी जेठे, चंद्रकला जेठे, मंगल जेठे आदीजण उपस्थित होते.
 
Top