बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : येथील दाणे गल्‍ली व किराणा बाजारात हमाली काम करणा-या नरसिंग तात्‍याबा मोरे यांनी कामगार दिनादिवशी हलगीच्‍या सुरात प्रत्‍येक दुकानात जात व्‍यापा-यांशी हस्‍तांदोलन केले व शुभेच्‍छा मिळविल्‍या.
    बार्शी तालुक्‍यातील बार्शी येथील नरसिंग मोरे यांनी सन 1970 पासून बार्शीत शारिरीक मेहनतीच्‍या कामाला स्‍वतःच्‍या उपजीवीकेचे साधन म्‍हणून स्विकारले. आज वयाच्‍या 62 व्‍या वर्षीही तो आपले काम प्रामाणिकपणे व विना कटकटीचे करीत आहेत. त्‍यांच्‍या इतर समव्‍यावसायिक साथीदारांनी त्‍यांच्‍या डोक्‍यावर फेटा बांधून गळ्यात हार घालून सत्‍कार केला व त्‍याच वेशात हलगीनाद करीत त्‍यांनी प्रत्‍येक व्‍यापा-यांशी हस्‍तांदोलन केले. त्‍यांचा मुलगा येथील एका व्‍यापा-याच्‍या दुकानी मुनीम म्‍हणून काम करीत आहे.
    व्‍यापारी व हमाल हे व्‍यापारातील दोन चाके असून दोघांना एकमेकांची गरज असते. व्‍यापारी हे श्रमिकांना प्रामाणिक कामाबद्दल त्‍वरीत मेहनताना देत असून वर्षभर ठेवलेले स्‍नेह अबाधित रहावे, हा संदेश घेऊन या नरसिंगने कामगार दिनाचे औचित्‍य साधून व्‍यापा-यांशी आपले स्‍नेह वृध्‍दींगत होण्‍यासाठी भेटी घेतल्‍या. ज्‍येष्‍ठांच्‍या पायाला हात लावत समवयस्‍कांच्‍या हातात हात देत शुभेच्‍छांचा स्विकार केला. संपूर्ण महाराष्‍ट्रभर कामगार दिनानिमित्‍त विविध मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होत असले तरी नरसिंगचा हा अनोखा उपक्रम त्‍याहून वेगळाच आहे.
 
Top