मुंबई -: बारावी परीक्षेत राज्यातील 79.95 टक्के विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असून यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 84.06 टक्के तर मुलांचा 76.62 टक्के लागला आहे. राज्यातील सर्व विभागात कोकण विभाग आघाडीवर आहे. कोकण विभागाचा निकाल 85.88 टक्के निकाल लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी निकाल जाहीर केला.
    यंदा विज्ञान, वाणिज्य आणि कला विभागातून परीक्षेत 12 लाख 76 हजार 356 विद्यार्थी बसले होते. यापैकी 9 लाख 25 हजार 741 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाने यंदाही निकालात अव्वल स्थान पटकावले आहे. गेल्या वर्षीही कोकण विभागाने लातूर, मुंबई, पुणे या विभागांना मागे टाकले होते. राज्यात सगळ्यात कमी निकाल नागपूर विभागातून लागला आहे.

विभागनिहाय निकाल पुढीलप्रमाणे....


पुणे- 81.91 %
नागपूर  73.10 %,
औरंगाबाद - 85.26 %,
मुंबई - 76.81 %,
कोल्हापूर - 84.14 %,
अमरावती - 82.19 %,
नाशिक - 79.01 %,
लातूर - 83.54 %,
कोकण - 85.88 %

      गुणपत्रिका महाविद्यालयांना गुरुवारी (6 जून) सकाळी 11 वाजता वितरित करण्यात येतील. ज्यांना गुणांची पडताळणी करायची आहे, त्यांनी मूळ गुणपत्रिका प्राप्त झाल्यानंतर विहित शुल्कासह 17 जूनपर्यंत मंडळाकडे अर्ज करता येतील. अर्जासोबत मूळ गुणपत्रिकेची छायांकित प्रत जोडणे अनिवार्य राहील. तसेच इंटरनेटवरील गुणपत्रिकेच्या आधारे गुणपडताळणीसाठी केलेले अर्ज अवैध ठरवण्यात येतील.
    फेब्रुवारी-मार्च 2013 च्या परीक्षेपासून उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करायचे असेल, त्यांनी छायांकित प्रत मिळाल्यापासून पाच दिवसांत मंडळाकडे अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 
Top