नळदुर्ग -: नंदगाव (ता. तुळजापूर) व परिसरात काही दिवसांपूर्वी जोरदार वादळी वारे झाले. त्‍यामुळे या भागातील वीजेचे खांब उन्‍मळून पडल्‍याने वीजपुरवठा गेल्‍या पाच दिवसांपासून खंडीत झाले असून पिण्‍याचे पाणी व लहान-मोठे व्‍यवसाय बंद पडल्‍याने व अंधा-याचे साम्राज्‍य पसरल्‍याने ग्रामस्‍थ हैराण झाले असून महावितरण कर्मचा-यांना ही घटना सांगूनही याकडे दूर्लक्ष करीत असल्‍याने ग्रामस्‍थांतून संताप व्‍यक्‍त केला जात आहे.
      नंदगाव परिसरास बोरगाव (तु.) येथील वीज उपकेंद्रातून विद्युतपुरवठा केला जातो. रविवारी सायंकाळी झालेल्या वादळी वार्‍यात गावातील अनेक खांब जमिनीवर आडवे झाले. तेव्हापासून वीजपुरवठा खंडित झाला असून, संपूर्ण गाव अंधारात आहे. गावाची लोकसंख्या सात हजारांच्या घरात असून, दळण, पाणीपुरवठा आदींवर विद्युत पुरवठय़ाअभावी परिणाम झाला आहे. सध्या असणार्‍या लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर गावातील नागरिकांना दळण आणण्यासाठी कित्येक किलोमीटरची पायपीट करून इतर गावांत जावे लागत आहे. असे असले तरी महावितरणचे अधिकारी मात्र वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कसलीच हालचाल करीत नसल्याने संतापाचे वातावरण पसरले आहे. पाण्यासाठी ग्रामस्‍थांना उन्‍हाच्‍या कडाक्‍यातही खूप दूरपर्यंत पायपीट करावी लागत असून महावितरण कंपनीने याप्रकरणी तातडीने लक्ष घालून तात्‍काळ वीजपुरवठा सुरळीत करण्‍याची मागणी ग्रामस्‍थांतून केली जात आहे.
 
Top