सोलापूर -: राज्य शासनाने गेल्या दोन वर्षात शिक्षण क्षेत्रातील अनेक समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच 'राईट टू एज्युकेशन' कायदा झाल्यापासून शाळेतील भौतिक सुविधा वाढविल्या आहेत. यामागे राज्यात चांगला विद्यार्थी घडला पाहिजे, ही शासनाची भूमिका असल्याचे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी केले.
     सोलापूर येथील रंगभवन येथे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित विविध पुरस्कार वितरण कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, उपाध्यक्ष सुभाष गुळवे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
    यावेळी बोलतांना राजेंद्र दर्डा म्हणाले की, गेल्या दोन वर्षात शासनाने शिक्षण क्षेत्रातील अनेक समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. शिक्षण सेवकांच्या माधनात वाढ केली. त्यांचे पदनाम बदलले. शाळेत मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह, पिण्याचे पाणी आदि सुविधा करण्यात आल्या. अतिरिक्त तुकड्यांचा प्रश्न सोडविण्यात आला. वेतनेत्तर अनुदान सुरु करण्याचा निर्णय घेतला.  राज्यात 1 कोटी 28 लाख विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व मध्यान्ह भोजन दिले जाते. यामागे राज्यात चांगला विद्यार्थी घडला पाहिजे ही भूमिका असल्याचे सांगितले. राज्यातील इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंतचा अभ्यासक्रम CBSE बरोबर आणला. यावर्षी 1 ली ते 2 रीचा अभ्यासक्रम नविन करुन नविन पुस्तके येत आहेत. यापुढील वर्षात पुढील इयत्तेचे अभ्यासक्रम बदलून चांगले दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.
     या प्रसंगी बोलतांना पालकमंत्री ढोबळे म्हणाले की, शिक्षणाने माणूस मोठा होतो. चांगुलपणा प्राप्त होतो, वैभव प्राप्त होते अशा प्रकारचे उत्तम शिक्षण शिक्षकांनी द्यावे. तसेच नैतिक मूल्याची जपणूक केली पाहिजे हा विचार समाजासमोर मांडावा असे आवाहन केले.
    यावेळी बोलतांना जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी म्हणाल्या की, शिक्षकांनी आपण सामाजिक अभियंता आहोत या जाणीवेने काम करुन भावि पिढी घडविण्याचे आवाहन केले.
    यावेळी जिल्हा परिषद शिक्षण सभापती शिवानंद पाटील, समाज कल्याण सभापती शिवाजी कोलते, कृषी सभापती जालिंदर भाऊ लांडे, महिला बालकल्याण सभापती श्रीमती जयमालाताई गायकवाड, शिक्षण विभागाचे अधिकारी, मुख्याध्यापक शिक्षक, विद्यार्थी, पालक बहुसंख्येने उपिस्थित होते.
 
Top