सोलापूर -: जिल्ह्यात विविध स्वयंसेवी संस्था, संघटना, माध्यमांच्या पुढाकाराने लोकसहभागातून विविध तलाव, बंधा-यातील गाळ काढण्याची मोहिम सुरु करुन मोठ योगदान दिले आहे. पाऊस सुरु होईपर्यंत हे काम चालू ठेवावे असे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले.
     जिल्ह्यातील हिप्परगा येथे तहसील कार्यालय उत्तर सोलापूर व दैनिक लोकमतच्या संयुक्त विद्यामाने तलावातील गाळ काढण्याच्या कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. यावेळी शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, आ. प्रणिती शिंदे, आ. दिलीपराव माने, आ. विजयकुमार देशमुख, महापौर अलकाताई राठोड, माजी मंत्री सर्व आनंदराव देवकाते, सिध्दराम म्हेत्रे, जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम, मनपा आयुक्त अजय सावरीकर आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
    यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, हिप्परगा तलावातील गाळ मोठ्या प्रमाणात काढला तर सोलापूर शहराला चांगल्या क्षमतेने पाणी देता येवू शकते. जिल्ह्यात या गाळ काढण्याच्या कामाला चांगली गती आली आहे. मोठ्या प्रमाणावर लोकसहभागातून गाळ काढून जमिनही सुपिक बनवावी असे आवाहन केले.
    याप्रसंगी बोलतांना शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा म्हणाले की, जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीत रडत न बसता संधी शोधण्याचे काम सुरु आहे. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासन मिळून दुष्काळाशी लढा देत आहे. विविध तलावातील गाळ काढल्यामुळे साठवण क्षमता वाढत आहे. त्याबरोबरच मोठ्या प्रमाणात भूगर्भात पाणी जावून त्याचाही उपयोग होईल असे प्रतिपादन केले.
    जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम म्हणाले की, अत्यंत भीषण दुष्काळातून आपण जात आहोत. शासन, प्रशासनाबरोबरच समाजातील विविध घटक, माध्यमांनी पुढे येवून गाळ काढण्यासाठी व टंचाईवर मात करण्यासाठी मदत करीत आहेत. हे काम सर्वांनी मिळून अधिक जोमाने करण्याचा निर्धार करु या असे आवाहन केले.
    याप्रसंगी आ. प्रणिती शिंदे, आ. दिलीपराव माने, आ. विजयकुमार देशमुख, माजी सिध्दराम म्हेत्रे, मनपा आयुक्त यांचेही समयोचित भाषण झाले.
     प्रारंभी दै. लोकमतचे संपादक राजा माने, उत्तर तहसीलच्या तहसीलदार श्रीमती अंजली मरोड यांनी या गाळ काढण्याच्या मोहिमेबातची माहिती दिली.
 
Top