पंढरपूर -: राज्यात यंदा दुष्काळाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर जाणवत असून, दुष्काळ निवारणाच्या कामी जनतेने प्रशासनास सहकार्य करावे तसेच विविध पक्षांनी एकत्र येवून दुष्काळाचा मुकाबला करावा असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
    घेरडी (ता.सांगोला) येथे चारा छावणीतील जनावरांसाठी मोफत पशुखाद्य योजनेचा शुभारंभ ना.पवार यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, जेष्ठ आ. गणपराव देशमुख, आ.दिपक आबा साळुंखे पाटील, माजी आ.सुधाकरपंत परिचारक, रामचंद्र साळे,  जिल्हा.सह.दुध संघाचे अध्यक्ष प्रशांत परिचारक, मनोहर डोंगरे, जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, आदी उपस्थित होते.
    उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले की, सध्या दुष्काळाची तीव्रता खुप वाढली आहे. सांगोला तालुक्यात याची तीव्रता अधिक जाण्वत असून हा दुष्काळ शेवटचा ठरावा यासाठी राज्य शासनाच्या वतीने तालुक्यातील अपूर्ण सिंचन योजना पुर्ण करण्याला प्राधान्य देण्यात येईल.जिल्ह्यातील फळबागा वाचविण्यासाठी शासनाच्या वतीने 113 कोटी देण्यात आले असून त्यापैकी एकट्या सांगोला तालुक्यासाठी सुमारे 42 कोटी रुपये दिल्याचेही त्यांनी सांगितले.
      पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे म्हणाले की, जनतेने उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करावा तसेच शेतक-यांनी पिकांसाठी ठिंबक सिंचनाचा वापर करावा. त्याचबरोबर म्हैसाळ योजनेचे पाणी सांगोला तालुक्याबरोबरच मंगळवेढा तालुक्यालाही मिळावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
    यावेळी जेष्ठ आ.गणपतराव देशमुख, आ.साळुंखे पाटील, प्रशांत परिचारक, घेरडीचे सरपंच दिलीप मोटे  यांनीही आपले समोयोचित विचार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी अधिकारी-पदाधिकारी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top