पुणे -: राष्ट्रीय पातळीवर यंदा सरासरीच्या 98 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तवला आहे. महाराष्ट्रात मात्र देशाच्या सरासरीपेक्षा थोडा अधिकच पाऊस बरसेल, असा अंदाज समोर आला आहे.
     शासनाच्या पातळीवरील खरीप हंगामपूर्व तयारी बैठक पुढच्या आठवड्यात मुंबईत होत आहे. त्यात ‘आयएमडी’तर्फे पावसाळ्याबाबत सादरीकरण होणार आहे. त्याचा तपशील ‘दिव्य मराठी’ने मिळवला असून, राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचे स्पष्ट संकेत आहेत. राज्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाचे भाकीत असले तरी विभागवार तपशील देणे शक्य नसल्याचे सूत्रांनी सांगितले. पावसाचा राज्यनिहाय अंदाज देशातच नव्हे तर जगातही कुठे दिला जात नाही. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, खान्देश, विदर्भ असा प्रदेशनिहाय पाऊस किती पडेल, याचा अंदाज बांधणे शक्य नाही. त्यासाठी आवश्यक यंत्रणाही देशात उपलब्ध नाही. परंतु, जागतिक हवामान विभागाकडून मिळालेली माहिती, गणितीय मॉडेल्स, जागतिक स्तरावरील निरिक्षणे, प्रायोगिक मॉडेल्स, उपग्रह चित्रे आदींच्या आधारे महाराष्ट्रातल्या पावसाचा अंदाज दिला आहे.

केरळात 3 जूनला येणार
‘‘नैऋत्य मोसमी वार्‍यांची (मान्सून) आगेकुच होण्यासाठी सध्याची हवामानस्थिती अनुकूल आहे. 3 जूनला केरळ किनारपट्टीवर मॉन्सूनचे आगमन होण्याचा अंदाज आहे. चार दिवसांच्या फरकाने ही तारीख मागे-पुढे होऊ शकते. वेळोवेळी निर्माण होणाऱ्या अनेक ‘सिस्टिम्स’वर मॉन्सूनचा पुढचा प्रवास अवलंबून असतो. यामुळे केरळात पोचल्यानंतर मॉन्सून महाराष्ट्रात कधी येईल, याचा अंदाज आताच करता येणार नाही.’’- डॉ. सदानंद पै, संचालक, लॉंग रेंज फोरकास्टींग, आयएमडी पुणे.

अंदमानात मान्सून

‘‘गेल्या आठवड्यापासून बंगालच्या उपसागरात घोंगावणारे चक्रीवादळ (महासेन) गुरुवारी समुद्रावरुन बांग्लादेशाच्या भूभागावर आले. चक्रीवादळाचा वेग कमी झाला असल्याने मॉन्सूनची आगेकूच होण्यास मदत होईल. पुढच्या 48 तासात बंगाल उपसागर आणि अंदमानच्या समुद्रात मॉन्सून पोचण्याची चिन्हे आहेत.’’- सतिश गांवकर, संचालक, हवामान अंदाज, आयएमडी, पुणे

सुकृत करंदीकर
साभार - दिव्‍यमराठी
 
Top