नळदुर्ग -: माघी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्‍या वारक-यांच्‍या दिंडीत कार घुसून तुळजापूर तालुक्‍यातील सहा वारकरी भाविकांचा दुर्दैवी मूत्‍यू दि. 16 फेब्रुवारी रोजी झाला होता. पशुसंवर्धन, दुग्‍धविकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा उस्‍मानाबाद जिल्‍ह्याचे पालकमंत्री ना. मधुकरराव चव्‍हाण यांच्‍या हस्‍ते नुकतेच मयत वारक-यांच्‍या वारसाना प्रत्‍येकी एक लाखाचे धनादेश देण्‍यात आले.
    तुळजापूर तालुक्‍यातील सिंदगाव, शहापूर, वागदरी येथील वारकरी पंढरपूरला माघी वारीसाठी पायी जात असताना सोलापूर-हैद्राबाद राष्‍ट्रीय महामार्गावरील मुळेगाव पाटीजवळ चाकोते पेट्रोल पंपासमोर वारक-यांच्‍या दिंडीत पहाटेच्‍या सुमारास कार घुसून झालेल्‍या भीषण अपघातात देविदास दत्‍तात्रय बणजगोळे (वय ४७), जयश्री देविदास बणजगोळे (वय ४२), उध्‍दव काशिनाथ पाटील (वय ३५), श्रीधर श्रीपतराव ताडकर (वय ३०) (सर्व रा. सिंदगाव, ता.तुळजापूर), सोनाबाई ऊर्फ कुसुम गोविंद गुरव (वय ५०, रा. वागदरी, ता.तुळजापूर), लोचना रणशुर जाधव (वय ४२, रा. शहापूर, ता. तुळजापूर) यांचा मृत्‍यू झाला होता. मयत वारक-यांचे कुटुंब या घटनेने खचून गेले. विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, प्रतिष्ठित व्‍यक्‍तींनी मयत वारक-यांच्‍या कुटुंबियाचे सांत्‍वन केले होते. दरम्‍यान, पालकमंत्री ना. मधुकरराव चव्‍हाण यांनी शासन दरबारी विशेष प्रयत्‍न करुन अवघ्‍या तीन महिन्‍यात मृत्‍यूमुखी पडलेल्‍या वारक-यांच्‍या वारसांना प्रत्‍येकी एक लाख रुपये मंजूर करुन घेतले. शासनाने मंजूर केलेला धनादेश वारसांना नळदुर्ग येथील इंदिरानगर याठिकाणी आयोजित कार्यक्रमात ना. चव्‍हाण यांच्‍या हस्‍ते सिंदगाव येथील मृत वारकरी बजनगोळे व ताडकर, वागदरी येथील सोनाबाई गुरव व शहापूर येथील लोचना जाधव यांच्‍या वारसाना प्रत्‍येकी एक लाख रुपयाचे धनादेश वाटप करण्‍यात आले. याप्रसंगी तहसिलदार व्‍यंकट कोळी, वारकरी संप्रदायाचे ज्ञानेश्‍वर माऊली महाराज माकणीकर, नगराध्‍यक्ष शब्‍बीर सावकार, उपनगराध्‍यक्ष शहबाज काझी, माजी नगराध्‍यक्ष दत्‍तात्रय दासकर, नगरसेवक नितीन कासार यांच्‍यासह नागरीक उ‍पस्थित होते.
 
Top