नळदुर्ग -:  चिवरी (ता. तुळजापूर) येथे शेतीसाठी उपयोगात असलेल्‍या जमिनीतील प्‍लॉटची ग्रामपंचायतीला नोंद करुन घ्‍या, अन्‍यथा कामकाज करु देणार नाही, असे म्‍हणत काही ग्रामस्‍थांनी सोमवार रोजी ग्रामपंचायतीला कुलूप घातल्‍याची घटना घडली.
    चिवरी (ता. तुळजापूर) येथे गावातील गावठाण जमीन अपुरी असल्‍याने ग्रामस्‍थांनी गावालगतच्‍या शेतात मोठ्याप्रमाणात प्‍लॉट खरेदी केली आहे. यातील अनेक ग्रामस्‍थांनी खरेदी केलेल्‍या या जागेवर घरांचे बांधकामही केले आहे. मात्र सदर घराची नोंद ग्रामपंचायत मालमत्‍ता रजिस्‍टरवर अद्यापपर्यंत झालेली नाही. या अनुषंगाने गावातील सतीश यादव तसेच इतर ग्रामस्‍थांनी सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्‍याच्‍या सुमारास ग्रामपंचायतीत जावून घराचा फेर घेण्‍याची विनंती तेथे उपस्थित असलेल्‍या ग्रामसेविकेकडे केली.
    यावेळी सदर ग्रामसेविकेने कृषी जमिनीचा वापर शासन नियमानुसार अकृषीसाठी करता येत नसल्‍याचे सांगितले. यावर सतीश यादव यांनी यापूर्वीच्‍या ग्रामसेवकांनी तशी नोंद केली आहे, असे सांगितले असता ग्रामसेविकेने घरपट्टी भरलेली पावती दाखविण्‍यास सांगितले. यावर घराची नोंद ग्रामपंचायत मालमत्‍ता रजिस्‍टरवर होत नसल्‍याचे लक्षात आल्‍याने संतप्‍त ग्रामस्‍थांनी ग्रामसेविकेला ग्रामपंचायतीबाहेर काढून कार्यालयाला जबरदस्‍तीने कुलूप ठोकले.
    ग्रामपंचायतीकडे गावठाण नसल्‍याने गावचा विस्‍तार व नागरिकांनी संपादित केलेली जमीन गावठाण हद्दीत घेऊन त्‍याच्‍या नोंदी करण्‍याची आवश्‍यकता आहे. असे होत नसल्‍यास प्‍लॉट खरेदी करुन काय फायदा, असा सवाल करीत, हवे असल्‍यास त्‍यावर कर आकारणीही करावी, अशी मागणी ग्रामस्‍थांनी केली.
    दरम्‍यान, याबाबत ग्रामसेविका स्‍वाती चोपडे यांच्‍याशी संपर्क साधले असता, शासन निर्देशाप्रमाणे कृषी जमिनीची अकृषीनुसार नोंद करता येत नाही. मी एक महिन्‍यांपूर्वीच चिवरी येथे रुजू झाले असून माझ्याकडे दिंडेगाव येथील अतिरिक्‍त पदभार आहे. सोमवारी येथे कर्तव्‍य पार पाडण्‍यासाठी आले असता हा प्रकार घडला. याबाबत वरिष्‍ठांना कळविण्‍यात आले असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
 
Top