बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: बार्शी उपसा सिंचन योजनेच्‍या पहिल्‍या टप्‍प्‍यातील रिधोरे ते उपळाई (ठोंगे) उर्ध्‍वगामी नलिका टाकणेचे काम अंतिम टप्‍प्‍यात आले आहे. आमदार दिलीप सोपल यांनी काम पूर्ततेच्‍या अनुषंगाने चालू कामाची पाहणी व कामावर आढावा बैठक घेतली.
    बार्शी उपसा सिंचन योजनेच्‍या उदभव असणा-या रिधोरे (ता. माढा) येथील पंपगृह टप्‍पा एकचे काम अंतीम टप्‍प्‍यात असून रिधोरे ते उपळाई दरम्‍यान दहा किलोमीटर उर्ध्‍वगामी नलिका टाकण्‍याचे काम अंतिम टप्‍प्‍यात आहे. जुनच्‍या 10 तारखेपर्यंत सदरचे काम पूर्ण होईल. उपळाई ते लक्षाचीवाडी कॅनॉलच्‍या कामातील सर्व कामे पूर्ण झालेली आहे. लक्षाचीवाडी येथील पंपगृह टप्‍पा दोनच्‍या कामाचाही यावेळी आढावा घेण्‍यात आला. लक्षाचीवाडी ते बार्शी बायपास कॅनॉलदरम्‍यान राहिलेल्‍या फक्‍त परंडा रोडवरील पुलाच्‍या कामाला सुरुवात करण्‍याचे आदेशही यावेळी देण्‍यात आले. यांत्रिकी व विद्युत विभागाकडील पंप, पाईप्‍स, कॅपॅसिटर, ट्रान्‍सफॉर्मर, इन्‍सुलेटर इत्‍यादी साहित्‍याचा ठेकेदारामार्फत पुरवठाही झाला आहे. लक्षाचीवाडी स्थित पंपगृह टप्‍पा दोनच्‍या ठिकाणी सदरचे साहित्‍य ठेवण्‍यात आले.
    यावेळी राष्‍ट्रवादी युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस नागेश अक्‍कलकोटे, अधिक्षक अभियंता तोंडे, कार्यकारी अभियंता बिराजदार, उपअभियंता तिपराधी, शाखा अभियंता होनखांबे, यांत्रिकी शाखेचे उपअभियंता मोरे, विद्युत शाखेचे उपअभियंता जवळगांवकर आदी उपस्थित होते.
 
Top