बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : आपल्या काही चुकांमुळे आमदारकी हातची गेली असली तरी देखील जनतेने आपल्यावर विश्वास दाखवत पंचायत समिती व जिल्हा परिषदेची सत्ता दिली, त्या विश्वासाला तडा न जाऊ देता आमदारकीपेक्षा पाचपट निधी खर्चून ग्रामीण भागातील विकास कामे मार्गी लावला तर विरोधकांनी जनतेशी पाठ फिरवल्याचे मत माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केले.
    दलितवस्ती सुधारणा अंतर्गत तसेच विविध कामांच्या शुभारंभाप्रसंगी बार्शी तालुक्यातील पांगरी येथील कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सभापती कौसल्या माळी, उपसभापती केशव घोगरे, शशिकांत नारकर, युवा काँग्रेसचे विनोद काटे, जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अरुण बारबोले, जि.प. विरोधी पक्षनेते संजय पाटील, वैरागचे संतोष निंबाळकर, ॲड. अनिल पाटील, हनुमंत धस, लक्ष्मण संकपाळ, खुशाल मुंढे, दत्ता काकडे, सुहास देशमुख, सतेज पाटील, सरंपच काकडे आदीजण उपस्थित होते.
    पुढे बोलताना राजेंद्र राऊत म्हणाले की, सत्ता आल्यावर माणसे पाठ फिरवतात, परंतु आपल्याकडील कोणत्याही सदस्याने अथवा कार्यकर्त्याने जनतेला पाठ दाखवली नाही. सन 1996 पासून पांगरीतील जनतेने आपल्यावर विश्वास दाखविला आहे. तरुणांचे सहकार्य व आपल्यावरील व्यक्त केलेले प्रेम याची आपण सदैव जाणीव ठेवतो. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत दुषित पाण्यामुळे रोगराई वाढत आहे व दवाखाने हाऊसफुल्ल होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी स्वच्छतेची व आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. वरचेवर अत्याधुनिक मशिनरीच्या सहाययाने शेतीची कामे केली जात असल्याने शेतकरी कष्ट करण्यापासून दूर चालला आहे. त्यामुळे त्याच्या शरिराची पचनक्षमताही बदलत चालली आहे.
    पांगरीची लोकसंख्या चांगली असल्याने व या गावाला होणा-या पाणीपुरवठयाच्या तलावाची अवस्था चांगली नसल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला. त्यावर टंचाई आराखडा तयार करुन तात्पुरता तातडीचा पाणीपुरवठावर पांढरी येथून सुरु करण्यात आला. येणा-या काही महिन्यात पाथरी ते पांगरी कायमस्वरुपी योजना कार्यान्वित करण्यासाठी सुमारे 2.25 कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी मिळत आहे. त्यामुळे चांगल्या फिल्टर पाण्याची व कायमचा प्रश्न निघणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतक-यांना कर्जपुरवठा करण्याऐवजी संचालकांनाच मोठयाप्रमाणात कर्जपुरवठा केला जातो व सर्वसामान्य शेतक-यांची अडवणूक केली जाते. विदयुत रोहित्रांमध्ये बिघाड झाल्यावर काहीजण बेकायदा रक्कम गोळा करीत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतक-यांचे काटे मारले जातात. आपण शेतकरी बांधवांच्या व ग्रामीण भागातील नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.
    यावेळी पंचायत समिती सभापती कौसल्या माळी, उपसभापती केशव घोगरे, जि.प. विरोधी पक्षनेते संजय पाटील आदींनी आपले विचार मांडले. विशार यांनी प्रास्ताविक व आभार मानले.
 
Top