बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या विचारानुसार शिवसेना पक्षप्रमुख उध्‍दव ठाकरे यांच्‍या कल्‍पनेप्रमाणे दुष्‍काळग्रस्‍त अल्‍पभूधारक शेतक-यांची जमीन मोफत नांगरून व पेरुन दिली जाणार असल्‍याची माहिती शिवसेनेचे भाऊसाहेब आंधळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
    बार्शी तालुक्‍यातील सहा जिल्‍हा परिषदा गटांतील शेतक-यांसाठी सहा नवीन ट्रॅक्‍टर घेतले असून त्‍याचे पूजन उध्‍दव ठाकरे यांच्‍या आज दि. 11 मे रोजी पोस्‍ट ऑफीस चौकात रात्री आठ वाजता होत आहे. यावेळी 101 पाण्‍याच्‍या टाक्‍यांचे पूजन होत असून मार्च महिन्‍यापासून सुरु असलेल्‍या पाण्‍याचे टँकरमध्‍ये 5 टँकरची वाढ करुन 15 टँकर अहोरात्र सुरु करण्‍यात येत आहेत.
    शिवसेनेच्‍यावतीने तालुक्‍यातील नारी, दडशिंगे, कोरफडे, सौंदरे, दहिटणे, सर्जापूर, वैराग, सारोळे, भांडेगाव, मालेगाव व बार्शी शहरात सात टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा केला जात आहे. वाढीव टँकरने घारी, मालवंडी इर्ले, आगळगाव येथे पाण्‍याचे टँकर देण्‍यात येतील. तसेच कोरफळे, नारी, दडशिंगे, सौंदरे, खांडवी या ठिकाणी बोअर मारुन पाण्‍याची सोय केली आहे. खामगाव येथे तीन हजार फुट पाईपलाईन करुन संपूर्ण गावच्‍या पाणीपुरवठ्याची सोय केली आहे. सौंदरे येथे पाणी साठवणूकीसाठी मोठा हौद बांधला आहे. मागणी व गरजेनुसार यापुढील काळात पाण्‍याची सोय करण्‍यात येणार आहे. दिवाळीच्‍या दरम्‍यान टॅक्‍टरच्‍या संख्‍येत वाढ करण्‍यात येणार आहे. दुष्‍काळाच्‍या पार्श्‍वभूमीवर स्‍वतःच्‍या खिशात हात घालून शिवसेना शेतकरी व ग्रामस्‍थांना दिलासा देण्‍याचा प्रयत्‍न करत आहे. मात्र बार्शी नगरपरिषदेकडून पाण्‍याची उपलब्‍धता असताना व सदरचे पाणी केवळ शेतकरी व जनतेच्‍या पिण्‍यासाठी वापरले जात असतानाही अडवणूक केली जात आहे.
    परंडा (जि. उस्‍मानाबाद) येथे आज दि. 11 मे रोजी पाच वाजता उध्‍दवी यांच्‍या दुष्‍काळाच्‍या पार्श्‍वभूमीवर जाहीर सभा होत आहे. या सभेसाठी बार्शी तालुक्‍यातील शिवसैनिक मोठ्या संख्‍येने वाजत गाजत बार्शी शहरातील काही मार्गावरुन परंडा येथे निघणार आहेत.
    या पत्रकार परिषदेत शिक्षक शिक्षकेतर स्‍थानिक लोकाधिकारी समितीचे सरचिटणीस प्रा. दिलीप देशमुख, भाऊसाहेब आंधळकर, नागजी नान्‍नजकर, बाबासाहेब कापसे, काका गायकवाड, जयगुरु स्‍वामी, विजय जगदाळे, दिपक आंधळकर, सुशांत गायकवाड आदीजण उपस्थित होते.
 
Top