ठाणे -: ठाण्‍यातील तरुणीला फेसबुकवर तरुणाशी केलेली मैत्री महागात पडली आहे. लग्‍नाचे आमिष दाखवून या तरुणाने संबंधित तरुणीला 48 हजार रुपयांना गंडा घातला. त्‍यानंतरही त्‍याने पैशाची मागणी केल्‍याने डोळे उघडलेल्‍या या तरुणीने पोलीस ठाण्‍यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी सोलापूर येथे राहणा-या अविनाश दळवे याला अटक केली आहे.
    ठाण्‍यात राहणा-या एका 27 वर्षाच्‍या तरुणीची फेसबुकच्‍या माध्‍यमातून अविनाश या 25 वर्षच्‍या तरुणाशी ओळख झाली. अविनाशने या तरुणीला लग्‍नाचे आमिष दाखवून ठाण्‍यात भेटायला येतो, असे सांगितले. भेटायला आल्‍यावर त्‍याने या तरुणीकडून महत्‍त्‍वाची कामे आहे, असे सांगून 48 हजार रुपये घेतले. मात्र, त्‍यानंतरही अविनाशने सबंधित तरुणीकडे आणखी पैशांचा तगादा लावला. तरुणीने आणखी पैसे देण्‍यास नकार दिल्‍यानंतर अविनाशने तरुणीच्‍या आई-वडिलांची हत्‍या करुन स्‍वतःचेही बरेवाईट करण्‍याची धमकी दिली.  या प्रकारामुळे घाबरलेल्‍या तरुणीने राबोडी पोलीस ठाण्‍यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अविनाशला सोलापूरहून अटक केली आहे.
 
Top