सोलापूर -: आपत्ती नियंत्रणासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष करण्यात आला आहे. प्रत्येक तालुकास्तरावरही नियंत्रण स्थापन करावा. तो 24 तास चालू ठेवावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम यांनी केले.
    जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सुन पूर्वतयारी 2013 च्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना बोलत होते. यावेळी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड उपस्थित होते.
    यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, उपविभागीय स्तरावर व तालुका स्तरावरील नियंत्रण कक्षात संपर्क अधिका-यांच नेमणूका करुन त्यांचे कार्यालयीन, निवासी व भ्रमणध्वनी क्रमांकासह यादी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्याच्या सूचना दिल्या. तसेच जिल्ह्यातील कोणत्या धरणासाठी कोणत्या शाखा अभियंत्याशी संपर्क साधावा त्याचे संपर्क नंबरसह यादी देण्याचेही संबंधितांना सूचित केले. त्याचप्रमाणे संभाव्य आपत्तीची माहिती त्या त्या विभागाने जिल्हाधिका-यांना त्वरित कळावावी उदा. धरणातील पाणी सोडणे, याबाबत पूर्वपरवागी शिवाय पाणी सोडू नये तसेच याबाबत कळवितांना त्याची प्रत संबंधित प्रांताधिकारी, तहसिलदार, पोलीस अधिक्षक, संबंधित पोलीस स्टेशन व संबंधित भागाचे रस्त्यांशी निगडीत कार्यकारी अभियंता यांना देण्याच्या सूचनाही डॉ. गेडाम यांनी दिल्या.
    तसेच पाण्याखाली रस्ता गेल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास व संबंधित तहसिलदारच्या नियंत्रण कक्षास त्वरित दूरध्वनीवरुन कळवावे. गाव पातळीवरील समित्या व शोध बचाव पथकांच्या नियुक्त्या तहसिलदार स्तरावर करण्यात याव्यात. जिल्ह्यातील सर्व राजपत्रित अधिका-यांच्या कार्यालयीन, निवासी दूरध्वनी, ई-मेलसह डिरेक्टरी तयार करावी. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक व पशुसंवर्धन अधिका-यांनी त्यांची वैद्यकीय पथके, औषधे, लस आवश्यक प्रमाणात उपलब्ध ठेवावी. पुराच्या पाण्याने बाधित होणा-या संभाव्य गावांसाठी जीवनावश्यक वस्तुंचा साठा उपलब्ध ठेवावा. उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, महानगरपालिका, नगरपालिकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात आपत्ती निवारणासाठी काय साहित्य उपलब्ध होऊ शकते याची यादी करुन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षास कळवावी. त्याचप्रमाणे विविध वाहने उपलब्धतेबाबतही यादी तयार ठेवावी. आदिबाबत डॉ. गेडाम यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
    यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकक्षक अभियंता सुरकुटवार तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
 
Top