नवी दिल्‍ली -: केरळमध्‍ये ठरलेल्‍या वेळेत म्‍हणजे दि. 3 जून रोजी मान्‍सूनच्‍या पावसाचे आगमन होईल, अशी माहिती भारतीय हवामान खात्‍याकडून मंगळवारी देण्‍यात आली. गेल्‍या वर्षीचया तुलनेत यंदा पहिल्‍या टप्‍प्‍यात मान्‍सूनचा पाऊस चांगला पडण्‍याचा अंदाज आहे. केरळमध्‍ये ठरलेल्‍या वेळेत म्‍हणजे दि. 3 जून रोजी मान्‍सून येण्‍याचा अंदाज असला तरी याबाबतचे ठोस भाकीत आणखी काही दिवसानंतरच करता येईल, असे हवामान खात्‍याकडून सांगण्‍यात आले आहे.
    हवामान खात्‍याच्‍या ताज्‍या विश्‍लेषणानुसार दक्षिण-पश्चिम मान्‍सूनचे वारे अंदमानच्‍या समुद्रात तसेच बंगालच्‍या उपसागरात येऊन पोहोचले आहे. दि. 17 मे रोजी अंदमानमध्‍ये मान्‍सूनचा पहिला पाऊस पडला होता. यंदा ठरलेल्‍या वेळेपूर्वीच मान्‍सूनचा पाऊस अंदमानमध्‍ये पोहोचला होता. या पार्श्‍वभूमीवर केरममध्‍येही ठरलेल्‍या वेळेत मान्‍सून पोहचण्‍याचा अंदाज आहे. मागील वर्षी मान्‍सूनचा पाऊस सर्वसाधारण राहण्‍याचा अंदाज हवामान खात्‍याने व्‍यक्‍त केला होता. मात्र, प्रत्‍यक्षात 98 टक्‍के इतका पाऊस पडला होता. मान्‍सूनच्‍यर अपु-या पावसाचा फटका महाराष्‍ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, गुजरात, पंजाब आदी राज्‍यांना बसला होता. दुष्‍काळी परिस्थितीमुळे अजूनही ही राज्‍ये होरपळत असून या राज्‍यातील लोक चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत आहेत.
    देशातील 60 टक्‍के शेतीचे क्षेत्र पाण्‍यासाठी मान्‍सूनच्‍या पावसावर अवलंबून आहे. तांदूळ, सोयाबीन, कापूस, ज्‍वारी, बाजरी, मका आदी खरीप पिके या पावसावर येतात.    त्‍यामुळे चालूवर्षी चांगला पाऊस पडावा, अशी आशा शेतकरी करीत आहेत.   
 
Top