नळदुर्ग -: उस्‍मानाबाद जिल्‍ह्यात गेल्‍या तीन वर्षापासून कमी पाऊस झाल्‍याने जिल्‍हा दुष्‍काळामध्‍ये अक्षरशः होरपळत असून दुष्‍काळ निवारणासाठी सर्व सेवाभावी संस्‍था, संघटनांनी एकत्रित येवून प्रयत्‍न करण्‍याची गरज असल्‍याचे प्रतिपादन जेष्‍ठ समाजवादी विचारवंत साथी पन्‍नालाल सुराणा यांनी व्‍यक्‍त केले.
    नळदुर्ग येथील आपलं घर येथे राष्‍ट्रसेवा दल, रचनात्‍मक संघर्ष समिती व युवा जनशक्‍ती संघटना यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजित दुष्‍काळ निवारण चर्चासत्रप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जेष्‍ठ पत्रकार व्‍यंकटेश हंबीरे, रचनात्‍मक संघर्ष समितीच्‍या सुलक्षणा शिंदे, युवा जनशक्‍ती संघटनेचे अध्‍यक्ष मुकेश सोनकांबळे, आपलं घरचे व्‍यवस्‍थापक शिवाजी पोतदार, राष्‍ट्रसेवादलाचे जिल्‍हा कार्याध्‍यक्ष प्रा. शरद गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्‍हणून उपस्थित होते.
    पुढे बोलताना पन्‍नालाल सुराणा म्‍हणले की, शासनाने दुष्‍काळाकडे गांभिर्याने लक्ष देण्‍याची गरज असून पाणक्षेत्र विकास कार्यक्रम, कोल्‍हापुरी व वनराई बंधा-याची उभारण करणे, समांतर चर खोदकाम करुन पाणी जिरवण्‍याची प्रक्रिया घडली पाहिजे. त्‍यासाठी सरकारवर दबावही वाढवण्‍याची गरज असल्‍याचे ते म्‍हणाले.
    याप्रसंगी बोलताना पत्रकार व्‍यंकटेश हंबीरे म्‍हणाले की, तमाम संस्‍था संघटनांनी सरकारवर व प्रशासनावर दबावगट बनून काम करण्‍याची गरज आहे. रस्‍त्‍यावर उतरुन, आंदोलने करुन मागण्‍या मान्‍य करुन घेण्‍याचा कळ आता राहिला नसून प्रसिध्‍दी माध्‍यमांच्‍या माध्‍यमातून लक्‍तरे वेशिवर टांगली पाहिजेत, असे ते म्हणाले.
    यावेळी दयानंद काळुंके, भैरवनाथ कानडे, एस.के. गायकवाड, दादासाहेब बनसोडे यांच्‍यासह कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारुती बनसोडे यांनी तर प्रास्‍ताविक मुकेश सोनकांबळे यांनी केले.
 
Top