सोलापूर :- पावसाळा सुरु होण्यापूर्वी नद्या नाले रुंदीकरण करुन पाणीसाठवण्याचे काम त्वरीत सुरु करावे, असे आवाहन सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम यांनी केले.
    जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात आज गुरुवार दि. 30 मे रोजी जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय जलसहभागिता वर्ष 2013 अंतर्गत जलयुक्त गाव अभियान व नद्या पुनरुज्‍जीवन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हाधिका-यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर राजस्थानचे जलतज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. निशीगंधा माळी, उपाध्यक्ष सुभाष गुळवे, विरोधी पक्षनेते संजय पाटील, महिला व बालकल्याण सभापती जयमाला गायकवाड, समाजकल्याण सभापती शिवाजी कांबळे, कृषी सभापती जालिंदर लांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी गुरव उपस्थित होते.
    आपल्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी डॉ. गेडाम पुढे म्हणाले की, मनरेगासाठी जिल्ह्याला मागील वर्षी 80 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. यावर्षी जिल्हा नियोजन समितीमार्फत 60 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे.  तसेच जलसंधारण कामासाठीही विविध योजनांमधून निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून ही सर्व कामे पावसाळा सुरु होण्यापूर्वी करावीत. राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी सामाजिक चळवळ उभारुन 7 नद्या वाहत्या केल्या. तेथे सोलापूरपेक्षा कमी पाऊस असूनही आज पाण्याची मुबलकता आहे. त्यांची प्रेरणा घेऊन सोलापूर जिल्ह्यातही शिरपूर पॅटर्न वापरुन तसेच अन्य पाणी साठवण पध्दतींचा वापर करुन जमिनीतील पाणी पातळी वाढवता येणे शक्य आहे. ज्यामूळे सोलापूरला भविष्यात दुष्काळाला सामोरे जावे लागणार नाही. जिल्हा परिषदेने अलवर येथे झालेल्या जलसंधारणाच्या कामाची पहाणी करण्यासाठी एक भेट आयोजित करण्याचेही जिल्हाधिकारी डॉ. गेडाम यांनी सुचविले.
    जिल्ह्यातील पिक पध्दती बदलून कमी पाण्यावर येणारी नगदी पिके शेतक-यांनी घेण्याची आवश्यकता आहे. अतिरिक्त पाणी उपश्यामूळे पाण्याचा नैसर्गिक समतोल बिघडला आहे. तो पूर्ववत करण्यासाठी पावसाचे पाणी जमिनीत जिरवुन आहे त्या पाणी साठ्याचा योग्य नियोजनाद्वारे वापर करणे गरजेचे आहे. नदी नाल्यातील गाळ काढण्यासाठी जेसीबी करीता डीपीडीसी मधून इंधन पुरविले जाणा आहे. हा गाळ मात्र किमान 2 मीटर अंतरापेक्षा लांब टाकला तर पावसाच्या पाण्याने तो पुन्हा वाहून मूळ स्थितीत येणार नाही. प्रत्येक जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्यांनी स्वत: ला झोकून देऊन काम केले तर जिल्ह्याला दुष्काळाला तोंड द्यावे लागणार नाही.
     जलतज्ञ डॉ.राजेंद्रसिंह राणा यांनी राजस्थानमधील अलवर येथे केलेल्या जलसंधारण कामाची माहिती पीपीटी द्वारे दिली. सोलापूरात अलवर पेक्षा पाऊसमान जास्त आहे. त्यामूळे येथे जलसंधारणाचे काम कमी वेळेत आणि अधिक फायदेशीर ठरु शकते असे सांगितले. यासाठी प्रत्येकाने पावसाचा थेंबन थेंब जिरवून पिक पध्दतीत बदल करुन सामुदायिकरित्या प्रयत्न केले तर निश्चितच जलक्रांती घडू शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
     जि.प. अध्यक्षा डॉ. माळी म्हणाल्या की, दुष्काळाने सोलापूर जिल्ह्याला पाणी नियोजनाबाबत खुप काही शिकविले आहे. येथील जनतेला पाण्याची किंमत दुष्काळाच्या रुपाने मोजावी लागली असून जलतज्ञ डॉ. राणा यांच्या मार्गदर्शनाखाली अलवर सारखी जलक्रांती सोलापूर जिल्ह्यात नक्कीच होईल अशी ग्वाही दिली.
     मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार यांनी जलतज्ञ डॉ. राणा यांची चळवळ दिशा देणारी असून सोलापूरलाही याचा फायदा होईल असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरव यांनी तर आभार गुळवे यांनी मानले. कार्यक्रमास अनेक जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह शासकीय अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
 
Top