पंढरपूर -: अखेर उजनीचे पाणी रविवार रोजी चंद्रभागा नदीत पोहचल्याने तापलेल्या उन्हात नागरिकांसह भाविकांना दिलासा मिळाला आहे. पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, सोलापूर या शहरासाठी पिण्यासाठी उजनीतून पाणी सोडण्यात आले असून गेल्या महिन्याभरापासून नदी पात्र कोरडे पडले होते. त्यामुळे या पाण्यामुळे भाविकांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे चंद्रभागा नदी कोरडी पडली असून येथील बंधा-यात पाणी अडविल्यामुळे नदीच्या पाण्याचा एक थेंबही मिळणे मुश्कील झाले आहे. त्यातच उन्हाची काहिली वाढल्यामुळे स्थानिक नागरिकांनाही नेहमीसारखे पोहण्यासाठी चंद्रभागेत पाणी दुरापास्त झले तर येथे येणा-या हजारो भाविकांना चंद्रभागेच्या स्नानापासून वंचित राहावे लागले होते.
दरम्यान सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला शहराकरीता पिण्यासाठी दि. 9 मे रोजी उजनीतून 6 हजार 500 क्युसेक्सने पाणी सोडले असून यावेळी 5 टीएमसी पाणी नदीत सोडले जाणार आहे. तीन दिवसांच्या प्रवासानंतर हे पाणी रविवारी सकाळी पंढरीत येऊन पुढच्या प्रवासाला लागले आहे.
येथील बंधा-यात सध्या एक मीटरने पाणी साठवले असून गुरसाळे बंधाराही भरुन घेतला जाणार आहे. तसेच सोलापूरच्या औज बंधा-यात गरजेपुरता पाणीसाठा केल्यानंतर अखेरच्या टप्प्यात येथील बंधा-यात पाणी साठवले जाणार आहे.
सध्या पंढरपूर शहरातील तापमान 40 अंशाच्यावर पोहोचले असून उकाडा आणि प्रचंड तापलेल्या उन्हामुळे नागरिक हैराण झालेले असताना चंद्रभागा नदीत पाणी आल्यामुळे स्थानिक नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. पुढचे किमान पंधरा दिवस तरी चंद्रभागोच्या पात्रात पाणी राहणार असल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.