कार्डिफ -: शिखर धवनच्या (114) झंझावाती शतकाच्या बळावर भारतीय संघाने गुरुवारी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत शानदार विजय मिळवला. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 26 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 7 बाद 331 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला 305 धावापर्यंत मजल मारता आली.
    धावांचा पाठलाग करणार्‍या दक्षिण आफ्रिकेची निराशाजनक सुरुवात झाली. भुवनेश्वर कुमारने सलामीवीर सी. इंग्रामला (6) सुरेश रैनाकरवी झेलबाद केले. त्यापाठोपाठ उमेश यादवने हाशिम आमलाला धोनीकरवी झेलबाद केले. त्याने 15 चेंडूंत चार चौकारांसह 22 धावा काढल्या. उमेश व भुवनेश्वरने टीम इंडियाला महत्त्वाचे दोन बळी मिळवून दिले.

पीटरसन-डिव्हिलर्सची भागीदारी व्यर्थ
तिसर्‍या क्रमांकावर आलेल्या पीटरसन व कर्णधार एल्बी डिव्हिलर्सने संकटात सापडलेल्या संघाचा डाव सावरला.  या दोघांनी तिसर्‍या गड्यासाठी 124 धावांची भागीदारी केली. यामध्ये पीटरसनने 72 चेंडूंत सहा चौकारांसह 68 धावा काढल्या. तसेच कर्णधारपदाला साजेशी खेळी करत डिव्हिलर्सने 71 चेंडूंत सात चौकारांच्या साह्याने सामन्यात सर्वाधिक 70 धावा काढल्या. पीटरसन धावबाद झाला
.
डुप्लेसिस-मॅक्लारेनचा प्रयत्न अपयशी
फाफ डुप्लेसिस व मॅक्लारेनने (71*) अर्धशतकी भागीदारी करून संघाला विजय मिळवून देण्याचा केलेला प्रयत्न अपयशी ठरला. या दोघांनी सातव्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली. यामध्ये डुप्लेसिसने 23 चेंडूंत पाच चौकार ठोकून 30 धावा काढल्या.दरम्यान, इशांत शर्माने ही जोडी फोडली. त्याने डुप्लेसिसला सुरेश रैनाकरवी झेलबाद केले. 

उमेश, इशांत,जडेजा चमकले
गोलंदाजीत यादव, इशांत,भुवनेश्वर व  रवींद्र जडेजाने  प्रत्येकी दोन गडी बाद केले. उमेशने हाशिम व  डिव्हिलर्सला बाद केले. तत्पूर्वी,  भारताकडून सलामीवीर शिखर धवन व रोहित शर्माने पहिल्या विकेटसाठी 127 धावांच्या भागीदारी केली.   कोहली 31, कार्तिक 14, धोनी 27 आणि रवींद्र जडेजाने नाबाद 47 धावांचे योगदान दिले.

शिखर-रोहितचा झंझावात
तब्बल दोन वर्षांनंतर वनडेत पुनरागमन करणार्‍या शिखर धवनने कार्डिफच्या मैदानावर चौकारांची तुफानी फटकेबाजी केली. 27 वर्षीय धवनने 94 चेंडूंत 12 चौकारांसह एक षटकार ठोकून 114 धावा काढल्या. त्याने सलामीवीर रोहित शर्मासोबत(65)  21.2 षटकांत 127 धावांची भागीदारी केली. 26 वर्षीय रोहितने करिअरमधील 14 वे अर्धशतक 81 चेंडूंत आठ चौकार व एका षटकारात झळकावले. दिल्लीच्या धवनने यापूर्वी पाच वनडेत 69 धावा काढल्या होत्या. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामन्यात त्याला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. मात्र, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याने स्फोटक फलंदाजी करून शतक ठोकले.
 
Top