नळदुर्ग -: यमगरवाडी-मंगरुळ (ता. तुळजापूर) येथील एकलव्‍य प्रकल्‍पावर रविवार दि. 9 जून रोजी 'अभिरुप महापंच परिषदेचे' आयोजन करण्‍यात आले आहे.  भटक्या समाजासाठी असलेल्या जात पंचायतीचा अभाव लक्षात घेऊन भटक्या समाजातील अनिष्ठ रुढी, परंपरांचे निर्मूलन करून समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भटके विमुक्‍त विकास परिषदेच्‍यावतीने ही अभिरुप महापंच परिषद घेण्‍यात येत आहे.
    अभिरुप महापंच परिषदेचे उदघाटन सकाळी साडे दहा वाजता उस्‍मानाबाद जिल्‍ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांच्या हस्ते होणार आहे. त्‍यानंतर साडे अकरा वाजता अभिरुप जात पंचायत होणार आहे. दुपारी साडे बारा वाजता गटशः चर्चा होईल. त्‍यानंतर पावणे तीन वाजता गटशः निवेदन व ठराव, त्‍यानंतर सव्‍वा चार वाजता 'भटके विमुक्‍त व पोलीस प्रशासन' या विषयावर जिल्‍हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांचे व्‍याख्‍यान होणार आहे. सहा वाजता कार्यक्रमाचा समारोप होईल.
    भटके विमुक्‍त हा आपल्‍या समाजाचा अतिशय महत्‍त्‍वाचा घटक. इतर समाज स्थिर व सुखी राहावा, यासाठी या घटकाने भटकंती स्‍वीकारली. भटके विमुक्‍त जाती-जमाती मध्‍ये जात पंचायत ही खास व्‍यवस्‍था आहे. समाजांतर्गत व कुटुंबातर्गत भांडणतंटे सुलभपणे मिटविण्‍याची ही वैशिष्‍ट्यपूर्ण पध्‍दत आहे. अशी व्‍यवस्‍था सर्व समाजासमोर आणून त्‍या व्‍यवस्‍थेवर प्रकाश टाकण्‍याचा प्रयत्‍न भटके विमुक्‍त विकास परिषद करीत आहे. त्‍या प्रयत्‍नाचा एक भाग म्‍हणजे महापंच परिषद होय. परिषदेच्या वतीने महाराष्ट्रात भटक्या समाजातील नऊ अभिरुप जातपंचायतींच्या परिषदा घेण्यात आल्या. यामध्ये शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि संघटन या विषयांवर चर्चा करण्यात आली. महापंच परिषदेमध्ये भटक्यांच्या समाजातील बालविवाह, मुलींचे शिक्षण आदींबाबतीत प्रबोधन करण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या विविध योजनांची माहितीही देण्यात येणार आहे. या परिषदेमध्ये महाराष्ट्रातून पंच, उच्च शिक्षित, लोकप्रतिनिधी महिला आदी एक हजारापेक्षा अधिक नागरिक उपस्थित राहणार असल्‍याचे म्‍हटले आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहून सर्वांनी लाभ घेण्‍याचे आवाहन महाराष्‍ट्र भटके विमुक्‍त विकास परिषदेच्‍या अध्‍यक्षा डॉ. सुवर्णा रावळ, उपाध्‍यक्ष चंद्रकांत गडेकर, कार्यवाह नरसिंग झरे, भटके विमुक्‍त विकास प्रतिष्‍ठानचे उपाध्‍यक्ष डॉ. अभय शहापूरकर, महादेव गायकवाड, कार्यवाह रावसाहेब कुलकर्णी, प्रकल्‍प विश्‍वस्‍त उमाकांत मिटकर यांनी केले आहे.
 
Top