सोलापूर :- जगाच्या बाजारपेठेत विद्यार्थ्यांच्या अंगी असलेली गुणवत्ता हे भविष्यातील सगळ्यात मोठे भांडवल ठरणार असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री दिलीप सोपल यांनी केले.
        बार्शी येथील लोकमान्य टिळक नगरपालिका शाळा क्र. 5 येथे शाळेचे नवीन सत्र सुरु झाल्याबद्दल विद्यार्थ्यांचे स्वागत पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर नगराध्यक्ष कादरभाई तांबोळी, शिक्षण सभापती मुंडे, मुख्याधिकारी दत्तात्रय लांगी, शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी शेखर चिलवंत उपस्थित होते.
       यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. सोपल पुढे म्हणाले की, पालकांना व मुलांनाही आज शिक्षणाचे महत्व समजले आहे. त्यामूळे गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडविणे हे शिक्षकांसह पालकांचे व समाजाचेही काम आहे. नगरपालिका, जि.प. शाळांमध्ये गुणवत्ता वाढविण्याची जबाबदारी गुरुजनांवर अधिक असून जागतिक स्तरावर विद्यार्थ्यांच्या अंगी गुणवत्ता असेल तर तो नक्कीच यशस्वी होतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. परंपरागत शिक्षण आज कालबाह्य झाले असून जगामध्ये अधिक महत्व असणारे विषय शाळांमधून शिकविले गेले पाहिजेत. देशातील व महाराष्ट्रातील थोर विभुतींची ओळख शालेय शिक्षणातूनच करुन दिली तर त्यांना ते नीट समजून घेता येतील. इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या स्पर्धेत टिकण्याकरीता गणित, विज्ञान, मराठी आणि इंग्रजी विषयात विद्यार्थ्यांना मुखोदगत झाले पाहिजेत. यासाठी शिक्षकांनी त्यांच्याकडून तयारी करुन घेणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले.
       गुणवत्तावाढीसाठी भौतिक सोयीसुविधांपेक्षा विद्यार्थ्यांच्या मनात लहानपणापासूनच शिक्षणाची उर्मी निर्माण केली पाहिजे यासाठी पालक, शिक्षक व समाजातील इतर घटकांनी पुढाकार घेऊन त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण केली पाहिजे. बार्शी मध्ये दत्तक शाळा संकल्पना रुजतेयं. ही संकल्पना अधिक फोफावण्यासाठी धनिकांनी दत्तक शाळांसाठी सहभाग वाढविला पाहिजे असेही ते शेवटी म्हणाले.
     प्रारंभी ग्रंथदिंडीचे पूजन पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास शाळेतील शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.
 
Top