लातूर -: देशातील उच्च शिक्षणाचा संख्यात्मक विस्तार होत असतांना त्याचा गुणात्मक विकास होणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी लातूर येथे केले.
लातूर येथील दयानंद शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ राष्ट्रपती मुखर्जी यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकुरकर, लातूरचे पालकमंत्री सतेज पाटील, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष अरविंद सोनवणे, सचिव रमेश बियाणी यांची उपस्थिती होती.
आपल्या भाषणात राष्ट्रपती मुखर्जी म्हणाले की, देशातील 18 ते 24 वयोगटातील एकूण लोकसंख्येपैकी 7 टक्के लोकसंख्या शिक्षणाच्या प्रक्रियेत आहे. अन्य विकसित देशाच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. त्यामुळे उच्च शिक्षणाच्या संधीचा विस्तार होणे आवश्यक असून त्याच बरोबर हे शिक्षण गुणात्मकदृष्ट्या दर्जेदार आणि आर्थिकदृष्टीने परवडणारे असणे गरजेचे आहे. सरकारने उच्च शिक्षण आवाक्यात आणण्यासाठी शिष्यवृत्तींची संख्या वाढवलेली असली आणि शैक्षणिक कर्जाची सुविधा सुलभ केलेली असली तरी आर्थिकदृष्टीने उच्च शिक्षण परवडण्याच्यादृष्टीने आणखी पावले उचलली जाणे गरजेचे आहे. लातूर येथील दयानंद शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ राष्ट्रपती मुखर्जी यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकुरकर, लातूरचे पालकमंत्री सतेज पाटील, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष अरविंद सोनवणे, सचिव रमेश बियाणी यांची उपस्थिती होती.
आपल्या देशातील प्राचीनकाळातील तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला, वल्लभी, सोमपूरा अशा विद्यापीठांच्या वैभवशाली कालखंडाची आठवण करुन देवून राष्ट्रपती मुखर्जी म्हणाले की, तक्षशिला विद्यापीठ हे भारतीय, ग्रीक, चिनी आणि पर्शियन संस्कृतिच्या वैचारिक देवाणघेवाणीचे एक केंद्र होते. आज आपल्या देशात जागतिक दर्जाचे शिक्षण देणा-या संस्थांची संख्या कमी आहे त्यामुळे अनेक बुध्दीमान विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्यास प्राधान्य देतात ही परिस्थिती बदलली पाहिजे. देशातील विद्यापीठात शिक्षण घेऊन आणि संशोधन करुन सी. व्ही. रामन यांच्या सारख्या थोर शास्त्रज्ञाने नोबेल पारितोषिक प्राप्त केले. त्यानंतर देशातच शिक्षण घेवून व संशोधन करुन हे पारितोषिक मिळविण्याचा मान भारताला मिळालेला नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले.
उच्च शिक्षणाबरोबर संशोधनाचे महत्व आधोरेखित करतांना राष्ट्रपती म्हणाले की, संशोधनावर होणारा खर्च ही गुंतवणूक असते. या गुंतवणूकीचे चांगले परिणाम दिसण्यास कालावधी लागतो. अशी गुंतवणूक वाढणे गरजेचे असून देशातील उद्योगांनी त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. शिक्षण संस्थांनी उत्तम विद्यार्थी आणि उत्तम शिक्षक यांचा समन्वय घडवून आणून संशोधनाला चालना देणारे वातावरण निर्माण केले पाहिजे. संशोधनासाठी शिक्षण संस्था, सरकार आणि उद्योग क्षेत्र यांनी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता आहे. आज देशाची आणि जागतिक अर्थव्यवस्था ज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित असतांना उच्च शिक्षणाची गुणवत्ता व संशोधनाला वाव दिला जाणे याबाबी महत्वपूर्ण ठरतात याकडे त्यांनी लक्ष वेधले. संशोधनाला संस्था आणि सरकारने प्रोत्साहन देणे आणि संशोधनाच्या फलिताला उद्योजकांनी बाजारपेठ उपलब्ध करुन देणे याबाबी महत्वपूर्ण आहेत असेही ते म्हणाले.
शिक्षणामुळे मातृभूमीविषयीचे प्रेम, कर्तव्यपरायणता, सहानुभूती, ज्येष्ठांविषयी आणि महिलांविषयी आदर, शिस्त आणि विवेकशिल वागणूक व जबाबदारीने कृती करण्याची वृत्ती तसेच देशातील बहुविध परंपरांबद्दल अभिमान आणि सहिष्णूता या मूल्यांचा संस्कार व्हावयास हवा, असे नमूद करुन राष्ट्रपती म्हणाले की, शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे मोठे साधन आहे. स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती आणि महात्मा गांधी यांनी शिक्षणाकडे याचदृष्टीने पाहून त्याला महत्व दिलेले होते.
आपल्या भाषणाच्या प्रारंभी राष्ट्रपतींनी लातूरच्या शैक्षणिक परंपरेचा गौरव केला. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखालील मराठवाडा मुक्ती संग्रामाचे लातूर हे महत्वपूर्ण केंद्र होते आणि आज महाराष्ट्रातील ते एक महत्वाचे शैक्षणिक केंद्र आहे असे ते म्हणाले. दयानंद शिक्षण संस्थेचा गौरव करुन त्यांनी सुवर्ण महोत्सवाचा क्षण हा सिहांवलोकनाची संधी देतांना भविष्यातील वाटचालीबद्दल बांधिलकी निर्माण करण्यास प्रेरणा देतो, असे उद गार काढले.
या समारंभात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दारिद्र्य आणि निरक्षरता निर्मूलन, आरोग्य सेवांचा विकास व सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावणे अशी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर वाढता ठेवणे आवश्यक आहे असे नमूद केले. त्यासाठी उच्च शिक्षणाचा विस्तार होत असतांनाच ज्ञानाधिष्ठीत अर्थव्यवस्थेच्या आजच्या युगात त्याची गुणवत्ता ही महत्वपूर्ण असल्याचे सांगितले. लातूरच्या शैक्षणिक परंपरेचा गौरवपूर्ण उल्लेख करुन मुख्यमंत्री म्हणाले की, या शहराची शैक्षणिक क्षेत्रातील कीर्ती वाढविण्यात दयानंद शिक्षण संस्थेचा मोठा वाटा आहे. या शहराच्या विकासाला गती येण्यास येथील राजकीय नेतृत्व कारणीभूत ठरले असे नमूद करुन त्यांनी कै. विलासराव देशमुख आणि पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील यांच्या कर्तृत्वाचा गौरव केला.
पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील यांनी शिक्षणामुळे माणूस व्यवहारात ठाम आणि तात्विकदृष्ट्या अचूक भूमिका घेणारा असा घडला पाहिजे असे सांगितले. ते म्हणाले की, शिक्षणामुळे दृष्टी व्यापक झाली पाहिजे. आपली भाषा, आपले विचार, आपला दृष्टीकोन यांना शिक्षणाचे अधिष्ठान लाभले पाहिजे. त्यातून विवेकी माणूस घडतो. त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या रुपाने देशाला एक अनुभव संपन्न, व्यासंगी व बहुश्रत मार्गदर्शक लाभल्याचे सांगितले.
दयानंद शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त सुवर्णस्मरणशिल्प ही स्मरणिका तयार करण्यात आली असून या स्मरणिकेचे विमोचन राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या हस्ते झाले. त्यांनी या स्मरणिकेचे पहिली प्रत राष्ट्रपती मुखर्जी यांना प्रदान केली. या स्मरणिकेचे संपादन प्रा. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी केले.
संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी यांनी स्वागतपर प्रास्ताविकात संस्थेची वाटचाल विशद केली. संस्थेच्या पाच महाविद्यालयातून दहा हजारांवर विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
लाहोटी, अरविंद सोनवणे, सुरेश जैन, मुरलीधर इन्नानी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. मानुज रांदड व कुमूदिनी भार्गव यांनी सूत्रसंचालन तर रमेश बियाणी यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, खासदार रजनीताई पाटील, आमदार दिलीपराव देशमुख, अमित देशमुख, वैजनाथ शिंदे, बस्वराज पाटील, बाबासाहेब पाटील, सुधाकर भालेराव, महापौर स्मीता खानापूरे, जिल्हा परिषद अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.