बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: बार्शी तालुक्‍यात पडणा-या पावसाची नोंद ही केवळ बार्शी शहरातील एकमेव पर्जन्‍यमान उपकरणावरील नोंद होती. सदरच्‍या पावसाचे अनुमान अधिकृतपणे गृहीत धरुन शासनाला प्रत्‍येक वर्षी दैनंदिन अहवाल पाठविण्‍यात येत होता. सदर अहवाल हा कशाप्रकारे चुकीचा होता, यावर अनेक तज्ञांनी तपासणी करुन सांगितले.
    ग्रामीण भागातील वेगवेगळ्या अंतरावर पर्जन्‍यमान उपकरणे बसवणे गरजेचे होते. त्‍या सर्व पर्जन्‍यमान उपकरणांची सरासरी काढण्‍यात यावी आणि त्‍याची नोंद तालुक्‍याची नोंद गृहीत धरावी, त्‍याचप्रकारे त्‍या त्‍या भागातील स्‍वतंत्रही नोंद असावी, असा अभ्‍यासपूर्ण विचार पुढे आल्‍यावर त्‍याचा हवामान खात्‍यामध्‍ये यावर निर्णय घेण्‍यात आला. सदरची मागणी योग्‍य असल्‍याचे मत हवामान खात्‍याने सांगितल्‍यावर शासन स्‍तरावरुन विविध भागात पर्जन्‍यमापक यंत्रे बसवण्‍याचे निर्देश देण्‍यात आले.
    बार्शी तालुक्‍याच्‍या नोंदीसाठी नऊ मंडळामध्‍ये नव्‍याने पर्जन्‍यमापक केंद्र बसविण्‍यासाठी उपलब्‍ध करण्‍यात आले. त्‍याच्‍या उभारणीसाठी शासकीय जागा आरक्षित करण्‍यात आली. त्‍या ठिकाणी तारेचे कुंपण इत्‍यादी व्‍यवस्‍था करुन तसा अहवाल बार्शी तहसिलकडे देण्‍यात आला. सदरच्‍या बाबत वरिष्‍ठ कार्यालयाला अहवाल दिल्‍याची माहिती तहसिलदार बालाजी सोमवंशी यांनी दिली.
    बार्शी शहरातील तहसिल कार्यालय क्षेत्रात एकमेव पर्जन्‍यमापक केंद्र असून त्‍या ठिकाणी पडणा-या पावसाची नोंद करुन तो संपूर्ण तालुक्‍यात पडला असल्‍याची शासकीय नोंद आजपर्यंत होत होती. परंतु या पर्जन्‍यमापकात नोंद झालेला पाऊस हा केवळ शहरातील असल्‍याने ग्रामीण भागातील पावसाची नोंद या पर्जन्‍यमापकाच्‍या आधारे ग्राह्य धरुन त्‍याबाबतचा शासकीय अहवाल वरिष्‍ठ कार्यालयात पाठवण्‍यात येत होता.
    बार्शी तालुक्‍यात अवर्षणग्रस्‍त परिस्थिती निर्माण झालेली असतानाही सदरच्‍या अहवालाच्‍या आधारेच केवळ शहरातील एकमेव पर्जन्‍यमापकाच्‍या नोंदीचा आधार घेतल्‍याने शासनाच्‍या विविध सवलतीपासून बार्शी तालुक्‍याला वंचित रहावे लागते.
    सध्‍या बार्शी तालुका कार्यक्षेत्रात 138 गावे असून बार्शीसह 10 मंडल कार्यालये कार्यरत आहेत. त्‍यामध्‍ये बार्शी, आगळगाव, पांगरी, उपळे दुमाला, गौडगाव, नारी, वैराग, सुर्डी, पानगाव, खांडवी यांचा समावेश आहे. यातील ग्रामीण नऊ मंडळासाठी पर्जन्‍यमापक यंत्रे बसविण्‍यास उपलब्‍ध झाली असून त्‍याचे उभारणी करण्‍याचे काम चालू करण्‍यात आले आहे. येत्‍या चार ते पाच दिवसात सर्व कामकाज पूर्ण होईल, असे तहसिलदार यांनी सांगितले.
    बार्शी शहरातदेखील तहसिलजवळ असलेला पाऊस शहरातील मध्‍यवस्‍तीत नसल्‍याने इकडच्‍या भागात कोरडे वातावरण तर तहसिलच्‍या वरील भागात मोठा पाऊस असल्‍याचा अनुभव बार्शीकरांनी अनेक वेळा अनुभवला आहे. काही वेळेस या भागात कोरडे तर काही वेळी त्‍या भागात असा असमतोल असताना या एकमेव पर्जन्‍यमापक उपकरणावरील आधारित नोंद ही कागदोपत्री बरोबर दाखवून त्‍यावर सर्व प्रकारचे‍ निर्णय घेण्‍यात येत होते. सदरच्‍या प्रकारामुळे बार्शी तालुका हा दुष्‍काळाच्‍या यादीतून वगळला गेला होता. पावसाची अचूक नोंद होण्‍यासाठी ही उपकरणे बसविण्‍यात आल्‍यावर यापुढे या सर्व केंद्रावरील नोंदीची सरासरी यापुढे दिसून येईल.
 
Top