नळदुर्ग  -: येथील सरकार नानीमॉं (हजरता सय्यदा खैरुन्‍नीसा बेगम साहेबा) यांचा उरुस शनिवार दि. 15 जून रोजी होणार आहे.  तीन दिवसीय चालणा-या उरुसामध्‍ये विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्‍यात आले आहे.
    नळदुर्ग येथील सरकार नानीमॉं (सय्यदा खैरुन्‍नीसा बेगम) यांचे हे 38 वे उरुस आहे. दि. 14 ऑगस्‍ट 1947 साली त्‍या अनंतात विलीन झाल्‍या. त्‍यांचे माहेर नळदुर्ग असून विवाह झाल्‍याने कर्नाटक राज्‍यातील सेडम येथे वास्‍तव्‍यास होत्‍या. त्‍यांचे प्रत्‍येक बोल खरे ठरु लागल्‍याने दिवसेंदिवस भक्‍तांची गर्दी होऊ लागली. त्‍यानंतर नानीमॉं नळदुर्ग येथे कायमच्‍या राहण्‍यासाठी आल्‍या. याठिकाणीही परिसरातील अनेक भक्‍त त्‍यांच्‍याकडे गर्दी करु लागले. त्‍यांच्‍या सेवेत ईमदादउल्‍ला काझी आणि सोलापूर येथील दस्‍तगीर मुच्‍छाले हे भक्‍त त्‍यांच्‍या अखेरच्‍या क्षणापर्यंत सेवा करीत होते. त्‍यानंतर या सेवकांनी नानीमॉंच्‍या स्‍मरणार्थ दर्गाह उभा केले. याठिकाणी नानीमॉंचा उरुस मोठ्या उत्‍साहाने साजरा होऊ लागला. दि. 29 सप्‍टेंबर 1996 रोजी ईमदादउल्‍ला काझी यांचे निधन झाले. त्‍यानंतर रिजवानउल्‍ला काझी, दस्‍तगीर मुच्‍छाले व उरुस कमिटी यांनी दर्गाहची देखरेख व धार्मिक पध्‍दतीने उरुस उत्‍साहाने साजरा करतात. प्रत्‍येक अमावस्‍येला हिंदू-मुस्‍लीम भक्‍तगण मोठ्या संख्‍येनी नानीमॉंच्‍या दर्शनाला येतात. यादिवशी अन्‍नदान केले जाते. या उरुसासाठी राज्‍याच्‍या कानाकोप-यातून व परप्रांतातून भाविक सहभागी होवून आपले नवस पूर्ण करतात. उरुस साजरा होत असताना दि. 15 जून रोजी दुपारी रिजवानउल्‍ला काझी यांच्‍या घरातून संदल निघुन मुख्‍य बाजारपेठेतून नानीमॉं दर्गाहच्‍या ठिकाणी पोहचते. दुस-या दिवशी दि. 16 जून रोजी दुपारी दोन वाजता चिराग रोशनाईंचा कार्यक्रम होणार आहे. याच दिवशी दुपारी चार वाजता शाकेर-जाकेर कव्‍वाल व मुंबईच्‍या कॅसेट सिंगर परवीन शहजादी कव्‍वाला यांच्‍यात कव्‍वालीचा भव्‍य मुकाबला होणार आहे. दि. 17 जून रोजी उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्‍यात येणार आहे.
    या सर्व कार्यक्रमाचा लाभ भाविक व नागरिकांनी घ्‍यावा, असे आवाहन नानीमॉं दर्गाह कमिटीचे काझी रिजवानउल्‍ला ईमदादउल्‍ला यांनी करुन  उरुस यशस्‍वी करण्‍यासाठी काझी इम्रानउल्‍ला, म. हुसेन कासीमसाब मुच्‍छाले, ख्‍वॉंजा दस्‍तगीर हुसेन मुच्‍छाले हे परिश्रम घेत आहेत.
 
Top