बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: मार्केटिंग फेडरेशच्‍यावतीने शेतीमालाला हमीभाव देवून खरेदी करण्‍यात आलेला उडीद निकृष्‍ट दर्जाचा असल्‍याने शासनाची मोठी फसवणूक झाल्‍याची तक्रार माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी नाफेडकडे केली होती. सदरच्‍या तक्रारीची चौकशी करण्‍यात आली असून सदरची तक्रार बिनबुडाची असल्‍याचे चौकशीत निष्‍पन्‍न झाल्‍याचा अहवाल नाफेड, पुणे यांच्‍या कार्यालयातून प्राप्‍त झाल्‍याची माहिती पत्रकार परिषदेत आमदार दिलीप सोपल यांनी दिली.
    सदरच्‍या खरेदीमध्‍ये कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीचा कसलाही संबंध नसून सदरच्‍या शासनाच्‍या उपक्रमास त्‍यांनी केवळ जागा उपलब्‍ध करुन‍ दिली आहे. उडीद या शेतक-यांच्‍या पिकास 2800 ते 3000 भाव असताना केंद्र सरकारने हमीभाव जाहीर केला व शेतक-यांसाठी जागोजागी सेंटर्स उभी करुन 4300 रुपये भाव दिला. सदरच्‍या खरेदीवेळी एफएक्‍यू तसेच मॉईश्‍चर तपासणी करुन प्रत्‍येक केंद्रावर त्‍यांचेच अधिकारी नमुने घेवून तपासणी करुनच नियमानुसार खरेदी केली जात होती. तसे असेल तरच त्‍याला गोडावूनमध्‍ये ठेवण्‍याचा दाखला दिला जात होता. मार्केटिंग फेडरेशनकडून शेतक-यांना हमीभाव देवून विक्रमी खरेदी केली. यात त्‍या शेतक-यांचा सातबारा उतारा तपासून त्‍याच्‍या उता-यावर त्‍या पिकाची नोंद आहे का, याचीही तपासणी झाली मगच त्‍यांची खरेदी करण्‍यात आली. या खरेदीकरीता कोणत्‍या गावचा शेतकरी असायला हवा, याचा नियम नव्‍हता केवळ त्‍यांच्‍याकडे  असलेल्‍या सातबारावरील नोंद व त्‍याची ओळख त्‍याला मालाचा नमुना इत्‍यादी तपासणी करण्‍यात येत होती. विदर्भमध्‍ये धान्‍य, ज्‍वारी, तूर तर मराठवाड्याकडे खरीपाचे दोन सेंटर सुरु करण्यात आली. बार्शी, अक्‍कलकोट, उस्‍मानाबाद, उदगीर, उमरगा, बीड, नांदेड इत्‍यादी ठिकाणी खरेदी सुरु झाल्‍याने बाजारातील शेतीमालाच्‍या किमतीमध्‍ये वाढ झाली. दर्जा तपासून चाळणी करुन नेमून दिलेल्‍या अधिका-यांकडून त्‍याची तपासणी होती व त्‍यानंतरच त्‍याची खरेदी सुरु होती. ती खरेदी सुरु असताना तक्रार केली असती तर ती संयुक्‍तीक झाली असती परंतु आता तक्रार करुन स्‍टंट करुन पेपरला बातम्‍या छापवून आणणे, हा विरोधाभास व शेतक-यांच्‍या विरोधातील कृत्‍य आहे. राजेंद्र राऊत यांनी केवळ राजकीय द्वेष, बदनामी करण्‍याचा अयशस्‍वी प्रयत्‍न केला. राऊत यांचा आरोप बिनबुडाचा असल्‍याचे म्‍हटले आहे.
    राऊत यांची सदरची तक्रार ही त्‍यांच्‍या स्‍वतःच्‍या व्‍यवसायातील तसेच राजकीय अपयश झाकण्‍यासाठी केली तसेच त्‍यांचे किडलेल्‍या, कुजक्‍या मनोवृत्‍तीचे राजकारण असल्‍याचेही आमदार दिलीप सोपल यांनी यावेळी म्‍हटले.   
 
Top