बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: जामगाव (ता. बार्शी) जवळील रेल्वे रुळावर विचित्र अपघातात मयत झालेल्या महिलेची ओळख पटली असून बार्शी तालुक्यातील पांगरी येथील रेखा बालाजी गाडवे (वय 27) असे मयताचे नाव आहे. खामसवाडी येथील बापू जंगलू गाडवे यांची ती मुलगी आहे. तीन ते चार वर्षापूर्वी तिचे लग्न झाले होते. तिला मुलबाळ होत नसल्याचे सांगून तिला सातत्याने त्रास देण्यात येत होता. शनिवारी सकाळी अत्यंत संशयास्पदरित्या तिचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ निर्माण झाली होती. तिची ओळख पटल्यानंतर तिच्यामाहेरच्या नातेवाईकांना सदरचा प्रकार कळविण्यात आला. माहेरच्या नातेवाईकांनी अंत्यविधीनंतर पांगरी पोलिसात तिला सातत्याने जाच होता तसेच तिला दिल्या गेलेल्या मानसिक त्रासामुळेच तिचा मृत्यू झाला असून तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या बालाजी गाडवे (पती), सुनितला गाडवे (सासू), लक्ष्मण गाडवे (सासरा) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद मेमाणे हे करीत आहेत.