नळदुर्ग -: श्रीक्षेत्र रामतीर्थचा विकास होण्‍यासाठी सातत्‍याने प्रयत्‍न करण्‍यात आला आहे. यापुढेही शासनाच्‍या विविध योजनांतून या ठिकाणी विकासकामे करुन श्रीक्षेत्र रामतीर्थचा सर्वांगिण विकास करणार असल्‍याचे आश्‍वासन पालकमंत्री ना. मधुकरराव चव्‍हाण यांनी दिले.
    श्रीक्षेत्र रामतीर्थ येथे सुरु असलेल्‍या श्री ज्ञानेश्‍वर पारायण व अखंड हरिनाम सप्‍ताहाच्‍या समाप्‍ती कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी श्रीक्षेत्र रामतीर्थ येथे दि. 19 एप्रिलपासून राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघ जनकल्‍याण समितीच्‍यावतीने सुरु करण्‍यात आलेल्‍या चारा छावणीचाही यावेळी समारोप करण्‍यात आला. तब्‍बल 52 दिवस या ठिकाणी चारा छावणी सुरु होती.
    श्रीक्षेत्र रामतीर्थ येथे दि. 19 एप्रिल रोजी रामनवीच्‍या शुभमुहूर्तावर राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघ जनकल्‍याण समितीच्‍यावतीने गायींसाठी चारा छावणी सुरु करण्‍यात आली होती. तसेच 3 जूनपासून या ठिकाणी ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळा व लक्ष्‍मण शक्‍ती सोहळा सुरु करण्‍यात आला होता. दि. 9 जून रोजी चारा छावणीच्‍या समारोपाबरोबरच पारायण सोहळ्याचीही समाप्‍ती यावेळी करण्‍यात आली. या कार्यक्रमास पालकमंत्री ना. मधुकरराव चव्‍हाण, नगराध्‍यक्ष शब्‍बीर सावकार, माजी नगराध्‍यक्ष दत्‍तात्रय दासकर, पंचायत समितीचे सदस्‍य साहेबराव घुगे, जनकल्‍याण समितीचे प्रमुख व्‍यंकटराव चव्‍हाण, श्रीक्षेत्र रामतीर्थचे प्रमुख विष्‍णुदासा शर्मा महाराज, परभणीचे कॉन्‍ट्रॅक्‍टर रामप्रसाद घोडके, तहसिलदार व्‍ही.एल. कोळी, दिलीप सोमवंशी, हरिष जाधव, आदीजण उपस्थित होते. प्रारंभी रामतीर्थ देवस्‍थान समिती व पारायण समितीच्‍यावतीने सर्व मान्‍यवरांचा सत्‍कार करण्‍यात आला.
    यावेळी बोलताना ना. चव्‍हाण म्‍हणाले की, श्रीक्षेत्र रामतीर्थचा सर्वांगिण विकास व्‍हावा, यासाठी सातत्‍याने प्रयत्‍न करण्‍यात आला आहे. यापुढील काळातही विविध योजनांच्‍या माध्‍यमातून श्रीक्षेत्र रामतीर्थचा विकास करुन हे क्षेत्र सुंदर बनविण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात येईल. रामतीर्थजवळ 60 कोटी रुपये खर्चून बांधण्‍यात येत असलेल्‍या तलावामुळे श्रीक्षेत्र रामतीर्थच्‍या सौंदर्यात आणखी भर पडणार असल्‍याचे शेवटी ना. चव्‍हाण यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्र्याच्‍या हस्‍ते चारा छावणीचाही समारोप करण्‍यात आला. याप्रसंगी पारायण समितीचे बलभीम मुळे, राजकुमार पाटील, शिवाजी मिटकर, तुळशीराम मुळे, चारा छावणीचे डॉ. सात्विक शहा, सुशांत भूमकर, दत्‍ता राजमाने यांच्‍यासह रामतीर्थ येथील लक्ष्‍मण राठोड, नामेदव पवार, किसन पवार, गणपती पवार यांच्‍यासह भाविक, शेतकरी व नागरीक मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.
 
Top