अलमोरा :- ढगफूटी आणि महापूरात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या १० हजारांवर जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती उत्तराखंड विधानसभेचे सभापती गोविंदसिंह कुंजवल यांनी आज शनिवार रोजी दिली.
      यासंदर्भात गोविंदसिंह कुंजवल म्हणाले, की मी गढवाल भागाला भेट दिल्यानंतर मला वाटले होते, की मृतांची संख्या ४ ते ५ हजारांच्या घरात असेल. परंतु, आता मला मिळालेल्या माहितीनुसार आणि लोकांनी बघितलेल्या मृतदेहांनुसार मृतांची संख्या सुमारे १० हजारांवर जाण्याची दाट शक्यता आहे.
       मृतांची संख्या सांगण्यास हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी नकार दिला असून, सुमारे हजार नागरिक नैसर्गिक संकटात मृत्युमुखी पडले असावेत असे सांगितले आहे. राडारोडा काढल्यानंतर मृतांची नेमकी संख्या आपल्याला समजेल असेही त्यांनी सांगितले आहे.
      मृतदेह कुजत असल्याने रोगराई पसरण्याची शक्यता गृहित धरून तातडीने पावले उचलण्यात येत आहेत, असेही कुंजवल यांनी सांगितले आहे.

आई-वडिलांचा शोध न लागल्याने महिलेची आत्महत्या
केदारनाथच्या तिर्थयात्रेला गेलेल्या आई-वडिलांचा शोध न लागल्याने व्यतित झालेल्या एका ३५ वर्षिय महिलेने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मुळच्या मध्य प्रदेशच्या असलेल्या या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. १५ जून रोजी तिचे आई-वडिलांसोबत मोबाईल फोनच्या माध्यमातून संभाषण झाले होते. परंतु, त्यानंतर आई-वडिलांसोबत तिचा संपर्क होऊ शकला नाही. या महिलेचा पती तिच्या आई-वडिलांचा शोध घेण्यासाठी केदारनाथला गेला आहे. 
 
Top