मुंबई : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात लोकांना दवंडीद्वारे दिले जाणारे ग्रामसभेचे निमंत्रण प्रभावहीन ठरल्यामुळे यापुढे आता ग्रामसभेचे निमंत्रण गावातील लोकांना एसएमएसद्वारे देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे, अशी माहिती ग्रामविकास राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
    भारतात संसद, विधिमंडळ व ग्रामसभा या संस्थांच्या माध्यमातून निर्णय प्रक्रिया राबविली जाते. ग्रामसभा हा लोकशाहीतील सर्वात महत्त्वाचा पायाभूत घटक असून तेथील निर्णय प्रक्रियेत लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी त्यांची उपस्थिती आवश्यक असल्याचेही ते यावेळी म्हणाले. यासाठी ग्राम पंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या व भारत निर्माण योजनेतील नेमणूक केलेल्या स्वयंसेवकाच्या सहाय्याने ग्रामसेवकामार्फत सर्व मतदारांचे भ्रमणध्वनी जमा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गावपातळीवरील संग्राम कक्षाची मदत घेऊन ग्रामसभेबाबत तसेच ग्रामपंचायतीकडे इतर महत्त्वाच्या सूचना भ्रमणध्वनीद्वारे एसएमएस पाठविण्याबाबतची कार्यवाही ग्रामपंचायत करणार आहे. यासाठी डेटा एंट्री ऑपरेटर, तालुका व जिल्हा स्तरावरील संग्रामकक्ष पूर्ण सहकार्य करणार आहे. राज्यातील सर्व ग्रामसेवक व डेटा एंट्री ऑपरेटर यांना भ्रमणध्वनीद्वारे व विविध उपलब्ध संकेतस्थळावरुन लघु संदेश पाठविण्याकरिता तालुका पातळीवर गटविकास अधिकारी प्रशिक्षण देणार आहे.
    ग्रामसभेच्या सूचना सर्व ग्रामस्थांना एसएमएसद्वारे देण्यात येणार आहेत. ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मतदारांनी नवीन भ्रमणध्वनी क्रमांक मिळविल्यास त्याची माहिती ग्रामपंचायतीकडील संग्राम कक्षाकडे द्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा सांकेतांक क्रमांक 201306271357286820 असा आहे.
 
Top