बर्मिंगहॅम - पावसाच्या व्यत्ययानंतर अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडला 5 धावांनी पराभूत करून चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. पावसाच्या व्यत्ययामुळे 50 षटकांऐवजी सामना 20 षटकांचा करण्यात आला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 बाद 129 धावा काढल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडला 8 बाद 124 धावाच काढता आल्या.

धावांचा पाठलाग करताना इंग्लंडकडून इयान मोर्गनने 33 तर रवी बोपाराने 30 धावांचे योगदान दिले. ट्रॉटने 20 धावा काढल्या. इतर फलंदाजांनी निराशा केली. भारताकडून रवींद्र जडेजा, आर. अश्विन आणि ईशांत शर्मा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद करून इंग्लंडच्या फलंदाजांना रोखले.

भारताची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अत्यंत चांगले ठरल्याने छोट्या स्कोअरमध्येही भारताला बचाव करता आला. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकप (2007), वनडे वर्ल्डकप (2011) आणि आता चॅम्पियन्स ट्रॉफीचे (2013) चे विजेतेपद पटकावले.

तत्पूर्वी नाणेफेक जिंकून यजमान इंग्लंड संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या भारताकडून रोहित शर्मा व शिखर धवनने दमदार सुरुवात केली. दरम्यान, स्टुअर्ट ब्रॉडने सलामीवीर रोहित शर्माला (9)  त्रिफळाचीत करून संघाला पहिला बळी मिळवून दिला. तिस-या क्रमांकावर आलेल्या विराट कोहलीने धवनला महत्त्वाची साथ दिली. या दोघांनी दुस-या विकेटसाठी 31 धावांची भागीदारी करून संघाच्या धावसंख्येला गती दिली. मात्र, ही जोडी फार काळ मैदानावर आव्हान कायम ठेवू शकली नाही. धवनला रवी बोपाराने ट्रेडवेलकरवी झेलबाद केले. त्याने 24 चेंडूत दोन चौकार व एका षटकारासह 31 धावांचे योगदान दिले.
त्यापाठोपाठ दिनेश कार्तिक (6) व सुरेश रैना (1) झटपट बाद होऊन तंबूत परतले. दरम्यान, कर्णधार महेंद्रसिंग धोनीनेही सर्वांची निराशा केली. त्याला सामन्यात भोपळाही फोडता आला नाही. रवी बोपाराने धोनीला शून्यावर बाद करून इंग्लंडला महत्त्वाचा बळी मिळवून दिला. सातव्या क्रमांकावर आलेल्या रवींद्र जडेजाने कंबर कसली. त्याने विराट कोहलीसोबत सहाव्या गड्यासाठी 47 धावांची भागीदारी केली.

यासह या जोडीने संघाला सन्मानजनक धावसंख्या उभी करून दिली. या वेळी अँडरसनने कोहलीला झेलबाद करून चॅम्पियन्स ट्रॉफीत न्यूझीलंडच्या मॅक्लाघननसोबत सर्वाधिक 11 बळी पूर्ण केले.

कोहलीने 34 चेंडूंत चार चौकार व एका षटकारासह संघाकडून सर्वाधिक 43 धावा काढल्या. दरम्यान, रवींद्र जडेजाने 25 चेंडूंत दोन चौकार व दोन षटकारांसह नाबाद 33 धावा काढल्या. गोलंदाजीत इंग्लंडच्या रवी बोपाराने चार षटकांत 20 धावा देत 3 बळी घेतले. अँडरसन, ब्रॉड व ट्रेडवेलने प्रत्येकी एक गडी बाद केला.


गोल्डन कामगिरी
363 शिखर धवन
12 रवींद्र जडेजा

धावफलक
भारत    धावा    चेंडू    4    6
रोहित शर्मा त्रि.गो. ब्रॉड    9    14    1    0
धवन झे.ट्रेडवेल गो. बोपारा     31    24    2    1
कोहली झे.बोपारा गो. अ‍ॅँडरसन    43    34    4    1
कार्तिक झे. मोर्गन गो.ट्रेडवेल    6    11    0    0
सुरेश रैना झे.कुक गो. बोपारा    1    6    0    0
धोनी झे.ट्रेडवेल गो. बोपारा    0    4    0    0
रवींद्र जडेजा नाबाद    33    25    2    2
आर. अश्विन धावबाद(बेल)    1    1    0    0
भुवनेश्वरकुमार नाबाद    1    1    0    0
अवांतर : 4. एकूण : 20 षटकांत 7 बाद 129 धावा. गडी बाद होण्याचा क्रम : 1-19, 2-50, 3-64, 4-66, 5-66, 6-113, 7-119. गोलंदाजी : जेम्स अ‍ॅँडरसन 4-0-24-1, स्टुअर्ट ब्रॉड 4-0-26-1, टीम ब्रेसनन 4-0-34-0, जे.ट्रेडवेल 4-0-25-1, रवी बोपारा 4-1-20-3.
इंग्लंड    धावा    चेंडू    4    6
कुक झे. अश्विन गो. यादव    2    9    0    0
बेल यष्टी.धोनी गो. जडेजा    13    16    1    0
ट्रॉट यष्टी.धोनी गो. अश्विन    20    17    2    0
रुट झे.इशांत गो. अश्विन    7    9    0    0
मोर्गन झे.अश्विन गो. ईशांत    33    30    3    1
बोपारा झे.अश्विन गो. ईशांत    30    25    0    2
जोस बटलर त्रि.गो. जडेजा    0    1    0    0
ब्रेसनन धावबाद (रोहित/धोनी)    2    4    0    0
स्टुअर्ट ब्रॉड नाबाद     7    5    1    0
ट्रेडवेल नाबाद    5    4    0    0
अवांतर : 5. एकूण : 20 षटकांत 8 बाद 124 धावा. गडी बाद होण्याचा क्रम :1-3, 2-28, 3-40, 4-46, 5-110, 6-110, 7-112,8-113, गोलंदाजी :  भुवनेश्वरकुमार 3-0-19-0, उमेश यादव 2-0-10-1, रवींद्र जडेजा 4-0-24-2, आर.अश्विन 4-1-15-2, ईशांत शर्मा 4-0-36-2, सुरेश रैना 3-0-19-0.

 
Top