नळदुर्ग -: येथील शिवकालीन व निजामकालीन आड व प्राचीन विहीरीमधील गाळ काढून दुरुस्‍तीच्‍या कामास सुरुवात झाली आहे. या कामासाठी सुमारे 15 लाख 35 हजार रुपयाचा निधी मंजूर केल्‍याची माहिती नगराध्‍यक्ष शब्‍बीरअली सय्यद सावकार यांनी दिली.
    नळदुर्ग शहरातील प्राचीन काळातील आड व विहीर असे मिळून आठ ठिकाणी असलेल्‍या विहीरीमधील गाळ काढून दुरुस्‍तीचे काम युध्‍दपातळीवर सुरु आहे. शहराला पाणीपुरवठा करणा-या बोरी धरणातील पाण्‍याचा मृतसाठा केंव्‍हाही संपुष्‍टात येण्‍याची शक्‍यता असून तीव्र पाणीटंचाईशी लढताना नागरिकाबरोबर प्रशासनाची दमछाक होत आहे. पाणी प्रश्‍न सोडविण्‍यासाठी शासनाने मोठ्याप्रमाणावर निधी खर्चूनही पाण्‍याचा प्रश्‍न सुटत नाही. येत्‍या काही दिवसात बोरी धरण पाणलोट क्षेत्रात मोठे पाऊस झाल्‍यास तात्‍पुरता का होईना पिण्‍याच्‍या पाण्‍याचा प्रश्‍न सुटणार आहे, अन्‍यथा पाऊस न झाल्‍यास आगामी काळात तुळजापूर, नळदुर्ग व अणदूर या गावाना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. आगामी काळात उदभवणा-या परिस्थितीशी मुकाबला करण्‍यासाठी शासन विविध उपाययोजना करीत आहे. नळदुर्गचे नगराध्‍यक्ष शब्‍बीरअली सय्यद सावकार यांनी शहरात पाणीटंचाई निर्माण झाली तर त्‍यावर मात करण्‍यासाठी शहरात असणारे प्राचीन व निजामकालीन आडातील गाळ काढून त्‍यांची दुरुस्‍ती करण्‍यासाठी जिल्‍हाधिका-यांनी निधी उपलब्‍ध करुन द्यावा, याबाबतचा प्रस्‍ताव जिल्‍हाधिका-यांर्कडे सादर केला होता. जिल्‍हाधिका-यांची नुकतीच याला मान्‍यता दिली असून यासाठी 15 लाख 35 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नगराध्‍यक्ष शब्‍बीरअली सावकार यांनी केलेल्‍या प्रयत्‍नामुळे शहरातील प्राचीन असणारी सोलखॉं मस्जिदीजवळील विहीर, साठेनगरजवळील राष्‍ट्रीय महामार्गात असलेला निजामकालीन आड, मराठा गल्‍ली येथील निजामकालीन आड, वसंतनगर येथील प्राचीन विहीर, भीमनगर येथील आड, गवळी गल्‍ली येथील आड, जुन्‍या जकात नाक्‍याजवळील आड, नागझरी येथे पाण्‍याची टाकी बांधणे, आदी विहीर व आडातील गाळ काढण्‍यात येणार आहे. बुधवारी सोलेखॉं मस्‍जीदजवळील प्राचीन विहीरीतील गाळ काढण्‍यास प्रारंभ करण्‍यात आला.
    पूर्वी या आड व विहीरीत अतिशय मुबलक पाणी होते. मात्र कालांतराने गाळ तसेच नागरिकांनी यामध्‍ये घाण टाकल्‍याने हे पाण्‍याचे स्‍त्रोत बुजून गेले आहेत. या विहीर व आडातील गाळ पूर्णपणे काढल्‍यानंतर संपूर्ण शहरातील तहान हे आड व विहीर भागवू शकणार आहेत. माजी नगरसेवक मुश्‍ताक कुरेशी, बाबू कुरेशी, नगरअभियंता स्‍वप्‍नील काळे, जिलानी कुरेशी हे सोलेखॉं मस्‍जीदजवळील विहीरीतील गाळ काढताना उपस्थित होते.
 
Top