उस्मानाबाद -: आपत्ती काळात जागरुक नागरिकाची भूमिका बजावली तर हानी कमी होऊ शकते. विविध यंत्रणांमार्फत आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य सुरु असते. या यंत्रणांचे काम सकारात्मक पद्धतीने जनतेसमोर मांडण्याचे काम प्रसिद्धी माध्यमे करत असतात, अशा शब्दांत जिल्हाधिकारी डॉ.के.एम.नागरगोजे आपत्ती व्यवस्थापनातील प्रसिद्धीमाध्यमांकडून असणाऱ्या अपेक्षा व्यक्त केल्या.
    जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने येथील रायगड फंक्शन हॉल येथे एकात्मिक प्रसिध्दी कार्यक्रमांतर्गत आपत्ती व्यवस्थापन व प्रसारमाध्यमांकडून प्रशासनाच्या अपेक्षा या विषयावर ग्रामसंवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उदघाटनपर भाषणात डॉ. नागरगोजे बोलत होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे, उस्मानाबाद पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही.बी. कोटेचा, सीना कोळेगाव पाटबंधारे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता श्री.आवलगावकर, होमगार्ड विभागाचे गजानन सुतार, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण यावेळी उपस्थित होते.
    डॉ.नागरगोजे म्हणाले की, आपत्ती व संकटे ही सांगून येत नाहीत. गावपातळीवर आपत्ती नियोजन आराखडा तयार करुन आपत्ती पासून बचाव करण्यासंबंधीची माहिती दिली जाते. मात्र जनजागृतीच्या दृष्टीने प्रसारमाध्यमांचे काम अतिशय महत्वाचे आहे.  विविध पद्धतीने येणाऱ्या आपत्तींची माहिती देऊन त्यापासून कसा बचाव करावयाचा याची माहिती या माध्यमातून जनतेपर्यंत गेल्यास हानी कमी होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले. आपत्ती व्यवस्थापनातील पूर्वतयारी महत्वाची असते. विविध यंत्रणा त्यासाठी कार्यरत असतात. या यंत्रणांची भूमिका आणि कार्यहीलोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
    श्रीमती तेलोरे यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची माहिती दिली. आपत्ती व्यवस्थापन कक्ष 2005 मध्ये स्थापन झाला. संकटकालीन आपत्तीच्या काळात काय करु नये, छोटे-छोटे अपघात कसे टाळता येतात, याची माहिती देऊन आपत्तीची तीव्रता कमी करण्याची ताकद प्रसारमाध्यमांमध्ये असल्याचे त्यांनी नमूद केले.आपला जिल्हा भूकंपप्रवण क्षेत्रात येतो. त्यादृष्टीने जिल्ह्यात भूकंप प्रतिरोधक घरे बांधणी करण्याबाबत प्रसारमाध्यमांनी जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले.
    कार्यकारी अभियंता कोटे व आवलगावकर यांनी पूरपरिस्थितीत सिंचन प्रकल्पांची घ्यावयाची काळजी, जनतेत करावयाची जागृती, पावसाळ्यात उद्भवणाऱ्या अडचणी व त्यावर करावयाची मात यावर सविस्तर विवेचन केले. तसेच संवादाच्या माध्यमातून त्यांनी विविध प्रश्नांनाही उत्तरे दिली.
    सुतार यांनी आपत्ती व्यवस्थापनात मदतकार्य करतांना करावयाच्या उपाययोजनांबाबत होमगार्ड दलाच्या वतीने विविध प्रात्यक्षिके सादर केली.
      जिल्हा आरोग्य विभागामार्फत जिल्हा शल्य चिकीत्सक डॅा. अशोक धाकतोडे आणि  श्रीमती मीरा दलभंजन यांनी नैसर्गिक आपत्ती काळात आरोग्य विभागामार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली.  पाणीटंचाईसारख्या आपत्तींचा सामना यावर्षी जिल्ह्याला करावा लागला. त्या पार्श्वभूमीवर एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमाबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी सविस्तर माहिती दिली.
       कार्यशाळेचा समारोपात जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील आपत्ती व्यवस्थापनात पोलीस दलाची भूमिका स्पष्ट केली. कोणत्याही आपत्तीच्या काळात महसूल व पोलीस दलाची भूमिका महत्वाची असते. नैसर्गिक व मानवनिर्मित अशा दोन्ही प्रकारच्या आपत्तीच्या काळात पोलीस दल नेहमीच समर्थपणे बचावकार्य करीत आला आहे. मात्र, सर्वसामान्य चांगला माणूस हाच कोणत्याही आपत्ती काळात महत्वाचा दुवा असतो. कारण आपत्तीच्या ठिकाणी तात्काळ मदत पोहोचविणे आवश्यक असते. अशावेळी प्रसारमाध्यमे ही सकारात्मक भूमिका बजावत असतात, असे त्यांनी सांगितले.
      कार्यशाळेत सहभागी झालेल्या जिल्ह्यातील विविध दैनिक, साप्ताहिकाचे संपादक, जिल्हा प्रतिनिधी, बातमीदार, वार्ताहर आदी प्रसारमाध्यम प्रतिनिधींना जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील, तोटावार, डॅा. धाकतोडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
     प्रारंभी चव्हाण यांनी प्रास्ताविकात  कार्यशाळा आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जून परदेशी व अशोक माळगे यांनी केले. जिल्हा माहिती कार्यालयातील एस.जी. शेळके, मकरंद नातू, आयुब पठाण, नरहरी गुट्टे, सिद्धेश्वर कोंपले, तानाजी सुरवसे, अनिल वाघमारे, अशोक सुरडकर, शशीकांत पवार, श्रीमती चित्रा घोडके यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. 
 
Top