तुळजापूर -: येथील नगरपालिकेच्‍या नगराध्यक्षपदी बिनविरोध विद्या दिलीप गंगणे यांची निवड झाल्‍याने समर्थक व कार्यकर्त्‍यांनी फटाक्‍याची आतिषबाजी करुन एकच जल्‍लोष केला.
    नगराध्यक्षा अर्चना गंगणे यांनी आपल्या पदाचा मुदतीपूर्वीच राजीनामा दिल्याने अध्यक्षपद रिक्त झाले
होते. तत्पूर्वी दीड महिना अनिता साळुंके या प्रभारी नगराध्यक्षा होत्या. मात्र, राजीनाम्यानंतर नवीन निवड प्रक्रियेस गती आली. यामध्ये विद्या गंगणे यांचेच चार अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित होती. शुक्रवारी दुपारी 12 वाजता नगराध्यक्ष निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पीठासीन अधिकारी तथा तहसीलदार व्ही. एल. कोळी यांनी नगराध्यक्षपदी गंगणे यांची निवड झाल्याचे घोषित केले. माजी अध्यक्षा अर्चना गंगणे यांनी नूतन अध्यक्षा विद्या गंगणे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष सुरेश देशमुख, तालुकाध्यक्ष गोकुळ शिंदे, शहराध्यक्ष राजामामा भोसले, माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर, गटनेता नारायणराजे गवळी, सज्जन साळुंके, सचिन देशमुख, विजय कंदले, बाळासाहेब शिंदे, अनिता साळुंके, रेखा कदम, डॉ. स्मिता लोंढे, जयर्शी कंदले, श्रीकृष्ण सूर्यवंशी, नितीन पाटील, अमर हंगरगेकर, प्रकाश मगर, रणजीत गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. निवडीनंतर नगराध्यक्षा गंगणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
 
Top