रामनाथी, गोवा, दि. ६ जून (विद्याधिराज सभागृहातून) -: अखिल भारतीय हिंदू अधिवेशन हौशागौशांचे संमेलन नाही ,तर हिंदु राष्ट्र स्थापण्याच्या उद्देशाने दूरदूरवरून आलेले हिंदु धर्मवीर आणि विचारवंत यांचे एकत्रीकरण आहे. आपणांस हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य कालनिर्धारित करून पूर्ण करायचे आहे.त्याकरि‍ता धर्मसंस्थापनेची देवता भगवान श्रीकृष्णाची उपासना करा, जेथे योगेश्‍वर कृष्ण असतो, तेथे विजय असतो, असे गीता सांगते;म्हणून वीरशाली अर्जुनासारखे भगवान श्रीकृष्णाचे उपासक बना, असे मार्गदर्शन करताना हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू.डॉ.चारुदत्त पिंगळे यांनी सांगितले.
    हिंदू जनजागृती समिती आणि पेडणे नवनिर्माण समिती यांच्या संयुक्त
विद्यमाने रामनाथी,गोवा येथील रामनाथ देवस्थानाच्या विद्याधिराज सभागृहात दि. ६ ते १० जून या कालावधीत चालणार्‍या द्वितीय अखिल भारतीय हिंदु अधिवेशनाला गुरूवार दि. ६ जूनला सकाळी प्रारंभ झाला. त्या वेळी प्रास्ताविक करतांना पू.डॉ.पिंगळे यांनी वरील मार्गदर्शन केले. भ्रष्ट राजकीय पक्ष सुखासुखी हिंदु राष्ट्र येऊ देणार नाहीत.त्यामुळे राजकीय पक्षांना या अधिवेशनात निमंत्रित केलेले नाही,असे.डॉ.पिंगळे यांनी स्पष्ट केले.
    या वेळी प.पू.श्रीकृष्ण कर्वे, प.पू.विजयकुमार देशमुख महाराज, श्री श्री प्रणवानंद रामस्वामी, श्री बसवराज स्वामी, स्वामी महेश योगी, स्वामी प्रज्ञानंद सरस्वती आणि मलेशियातील धर्माचार्य स्वामी कुमारानंद यांची प्रमुख उपस्थिती होती. शंखनाद, दीपप्रज्वलन करून व वेदमंत्रपठणाच्‍या जयघोषात या अधिवेशनास प्रारंभ झाले. त्यानंतर वरील संतांच्या हस्ते हिंदू जनजागृती समिती-निर्मित आणि सनातन-निर्मित मराठी, हिंदी आणि कन्नड भाषेतील ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. याव्यतिरिक्त, स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशनचे सिरीयाक वाले, त्यांची पत्नी सौ.योया वाले आणि सनातन प्रभात नियतकालिकांचे माजी समूह संपादक पृथ्वीराज हजारे यांचीही उपस्थिती होती.. या वेळी सिरीयाक वाले यांनी त्यांच्या साधनेतील प्रवासाविषयी माहिती दिली.
     राष्ट्र का हवे ?,या विषयावरील उद्बोधन सत्रात मार्गदर्शन करतांना कानपूरचे पीतांबर योगपिठाधीश्‍वर स्वामी प्रज्ञानंद सरस्वती म्हणाले, देशात ८० कोटी हिंदु आहेत. संसदेत, विधानसभांमध्ये बहुसंख्येने हिंदु असले, तरी कोणी हिंदु हिताचा विचार मांडत नाहीत. आज देशातील हिंदु धर्माची आणि हिंदूंची स्थिती वाईट आहे. हिंदू अशांत आहेत. एकही हिंदु धर्माविषयी बोलू शकत नाही. मेकॉलेच्या शिक्षण प्रणालीमुळे हिंदु धर्माची आणि हिंदूंची हानी झाली आहे. यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण दिले पाहिजे.
    कोलकाता येथील हिंदु एक्झीस्टन्स या संकेतस्थळाचे संपादक उपानंद ब्रह्मचारी म्हणाले, हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदूंच्या मनात संशय असल्याने अद्यापपर्यंत हिंदु राष्ट्राची स्थापना होऊ शकली नाही. यासाठी प्रत्येक हिंदूने हिंदु राष्ट्रासाठी आत्मविश्‍वास आणि श्रद्धा ठेवून कृतीशील झाले पाहिजे. बलाढ्य हिंदुत्ववादी संघटनांचा धर्माशी अल्प, तर राजकारणाशी अधिक जवळीक आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी धर्माशी जवळीक असली पाहिजे. हिंदु साक्षर झाले असले, तरी धर्माविषयी निरक्षर आहेत. हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. या स्थितीत लहान-मोठ्या सर्व हिंदुत्ववादी संघटना एकत्र आल्यास हिंदु राष्ट्र स्थापन होण्यास वेळ लागणार नाही.
     उत्तरप्रदेशातील आर्य समाजाचे स्वामी महेश योगी म्हणाले, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, तर गुजरातपासून ते बंगालपर्यंतच्या हिंदूंवर कोठेही संकट आले, तर सर्वत्रच्या हिंदूंनी संघटितपणे त्यांच्या साहाय्यासाठी धावून गेले पाहिजे. मुस्लिम व ख्रिस्ती समाजातील नागरीक आठवड्यातून एकदा एकत्र येतात, तर हिंदू महिन्यातूनही एकदा एकत्र का येऊ शकत नाहीत? हिंदुत्ववादाचा मुखवटा घालून कार्य करणार्‍यांना दूर करण्याची आवश्यकता आहे. रामराज्य हवे का, असे विचारल्यास देशातील कोणताही हिंदू कधीही नाही म्हणणार नाही. म्हणूनच आपल्याला हिंदु राष्ट्राची स्थापना केली पाहिजे.

* क्षणचित्रे

* या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण हिंदू जनजागृती समितीच्या संकेतस्थळावरील http:/www.hindujagruti.org/summit या मार्गिकेवरून थेट प्रक्षेपण करण्यात येत आहे.

* कांची कामकोटी पिठाचे शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती आणि पुरी पिठाचे शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांचे, तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकरजी यांचे हिंदु अधिवेशनासाठीचे आशीर्वादात्मक संदेश वाचून दाखवण्यात आले.

 
Top