सांगोला -: मातेला आपल्या देशाच्या संस्कृतीत उच्च स्थान दिलेले आहे. मातेला संरक्षण मिळावे यासाठी राज्य परिवहन महामंडळाने सुरु केलेला ‘हिरकणी कक्ष’ हा उपक्रम आपल्या संस्कृतीचाच एक भाग असल्याचे मत पोलीस निरिक्षक दयानंद गावडे यांनी व्यक्त केले.
    सांगोला बसस्थानकावर ‘हिरकणी कक्षा’चे उद्घाटन गावडे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, अनेक माताभगिनी बसस्थानकावर येतात. आपल्या तान्हुल्याची भूक भागवताना त्यांना संकोच वाटतो. त्यासाठी महामंडळाने अशा माताभगिनींसाठी सुरु केलेला हा उपक्रम म्हणजे माताभगिनींची सेवा करण्यासाठीच आहे. या उपक्रमाचा लाभ माताभगिनींना होणार आहे असे सांगून बसस्थानकावर टवाळगिरी करणार्‍यांचा बंदोबस्त करण्यासाठी आपण सक्षम असून लवकरच 24 तास पोलीस बसस्थानकासाठी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी आगार व्यवस्थापक एल.डी.जाधव यांनी या कक्ष स्थापनेविषयी आपली भूमिका मांडून जिल्ह्यातील पहिल्यांदाच अशा प्रकारचा कक्ष स्थापन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अशोक क्षीरसागर यांनीही आपले विचार व्यक्त केले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख मधुकर बनसोडे, युवा अध्यक्ष अनिल निंबाळकर, रमेश देशपांडे, अरुण बोत्रे, सतीश सावंत, भारत कदम, अरुण जगताप, प्रकाश महाजन आदींसह मान्यवर उपस्थित होते. आभार प्रदर्शन बाबासाहेब बनसोडे यांनी मानले.
 
Top