बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: महाराष्‍ट्र राज्‍य मार्केटिंग फेडरेशन मुंबई मार्फत धान्‍य आधारभूत उडीद खरेदीत झालेल्‍या भ्रष्‍टाचाराबाबत कार्यकारी संचालक भारतीय कृषी सहकारी विपणन संघ (नाफेड) नवी दिल्‍ली यांच्‍याकडे लेखी तक्रार दिली असून केंद्रीय पथक पाठवून चौकशी करावी आणि दोषीवर गुन्‍हे दाखल करावे, अशी मागणी माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी केली आहे.
    केंद्र शासनाने शेतक-यांसाठी आधारभूत किंमतीत धान्‍य खरेदीची योजना राबविली असून त्‍यानुसार महाराष्‍ट्र राज्‍य मार्केटिंग फेडरेशन मुंबईच्‍यावतीने सोलापूर जिल्‍ह्रयातील बार्शी येथे कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती, बार्शी आणि जिल्‍हा खरेदी विक्री संघ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने उडीद खरेदी केंद्र सुरु केले. सदरच्‍या उडीद खरेदी केंद्रावर पाच ते सहा हजार क्विंटल निकृष्‍ट प्रतीचा उडीद काही व्‍यापा-यांना हाताशी धरुन तसेच तालुक्‍यातील आणि आसपासच्‍या शेतक-यांची नावे दाखवून खरेदी केला. सदरचा उडीद वखार महामंडळाच्‍या गोडावूनमध्‍ये आहे. वखार महामंडळाच्‍या अधिका-यांनी राजकीय ताकदीचा वापर करुन संपूर्ण उडीद वखार महामंडळाच्‍या गोडावूनमध्‍ये ठेवला. सदर मालाची आपल्‍या केंद्र शासनाच्‍या नियमाप्रमाणे बार्शी येथील गोडावूनमध्‍ये तपासणी करावी, सक्षम अधिकारी पाठवून उडीद योग्‍य की निकृष्‍ट याची खातरजमा करावी, सदरच्‍या खरेदी केंद्रातील झालेल्‍या भ्रष्‍टाचाराची चौकशी करुन दोषीवर गुन्‍हे दाखल करावे. सामान्‍य शेतक-यांच्‍या योजनेवर डल्‍ला मारणा-यांना शासनार्थ कडक कारवाई करण्‍यात यावी, अशी मागणी माजी आमदार राजेंद्र राऊत यानी केली आहे.
    सदरच्‍या आधारभूत किमतीप्रमाणे सहा हजार क्विंटल उडीचाची किंमत प्रति क्विंटल 4 हजार 300 प्रमाणे 2 कोटी 58  लाख रुपये होईल. यापेक्षा जास्‍त खरेदी झाली असल्‍यास आणखी किंमत वाढण्‍याची शक्‍यता आहे.
 
Top