बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: सोलापूर जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेच्‍या सरव्‍यवस्‍थापक बदलण्‍याबाबतची तक्रार दिल्‍यानंतर सहाय्यक व्‍यवस्‍थापक पदे जवळजवळ रिक्‍त असून त्‍या जागी मर्जीतील ज्‍युनिअर ऑफिसर नेमून नियमबाह्य कामे करुन घेतली जात असल्‍याचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी मुख्‍य पबंधक महाराष्‍ट्र कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांच्‍याकडे केलेल्‍या लेखी तक्रारीत म्‍हटले आहे.
    तक्रारीत म्‍हटले आहे की, तालुकास्‍तरीय मुख्‍य शाखेत प्रथम श्रेणी पदाधिकारी दर्जाचा अधिकारी असायला हवा, परंतु प्रत्‍येक तालुक्‍याच्‍या संचालकाच्‍या मर्जीतील ज्युनिअर ऑफिसर ग्रेडच्‍या अधिका-यावर शाखा चालत आहेत. सदरच्‍या प्रकारामुळे सोने तारण सारख्‍या व्‍यवहारात अनेक गैरव्‍यवहार आढळून येत आहेत. जिल्‍हा बँकेतील ब-याच शाखेत ठेवलेले सोने तपासणे जरुरीचे आहे. ब-याच शाखेत शाखाधिकारी, व्‍हॅलवेटर सहमतीने बोगस सोने (बेंटेक्‍स) चा वापर करुन बँकेची फसवणूक केली आहे. नाबार्डने याची दखल घेऊन जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेतील सोनेतारण कर्ज नाबार्डला सक्षम अधिकारी पाठवून तपासणी करावी आणि प्रकरणाचा छडा लावावा.
    सोलापूर जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेच्‍या मार्केट यार्ड, सांगोला येथील शाखाधिकारी डी.व्‍ही. दिवटे यांच्‍यावर सांगोला पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल आहे. दि. 27 जुलै 2012 रोजी निलंबन झज्ञले व संचालकाच्‍या दबावामुळे दि. 4 फेब्रुवारी रोजी निलंबन कालावधी समाप्‍त केला व करमाळा शाखेत कामावर घेतले. मंद्रुप (ता. दक्षिण सोलापूर) शाखेकडील बँक इन्‍स्‍पेक्‍टर दि. 5 जानेवारी 2013 पासून निलंबित आहे. ए.ए.मोटे मळेगाव (ता. बार्शी) यांना दि. 16 ऑक्‍टोबर 2012 रोजी निलंबित केले आहे. ए.डी. चव्‍हाण शिपाई ति-हे यांना 9 लाख 52 हजार 200 रुपये रक्‍कमेच्‍या अपहार प्रकरणात दि. 22 सप्‍टेंबर 2012 रोजी निलंबित केले आहे. या सर्व कर्मचा-यांची निलंबने सहा महिन्‍यात रद्द करुन संचालक मंडळ यांनी जवळच्‍या शाखा देवून रुजू केले जाते. बँकेतील प्रामाणिक कर्मचारी यांची दहा ते बारा वर्षे 200 किलोमीटर अंतरावर बदली केली जाते. बँकेला स्‍टाफ पॅटर्न राबवण्‍याच्‍या सूचना नाबार्ड बँकेने तसेच रिझर्व बँकेच्‍या धोरणानुसार डिपॉझिट आणि कर्ज व्‍यवहार इत्‍यादी स्‍टाफचे संतुलन राखणेचे आदेशित करावे.
    स्‍टाफ संतुलनाचे आदेश, निलंबित कर्मचारी यांची फेरचौकशी, याकरीता शासनाचा सक्षम अधिकारी नेमावा, शेतक-यांना कर्जे देवून वसुल होणा-या व्‍याजावर पारदर्शक कारभार करावा व लोकाभिमुख कारभार करावा, अशी तक्रार व सूचना राऊत यांनी केली आहे.
 
Top