बीड : सोमनाथ खताळ
    काही दिवसांपुर्वी पदवीपूर्व शालेय अभ्यासक्रम शिकवणार्‍या विद्यालयांची म्हणजेच राज्यातील डी.एड. कॉलेजेसची तपासणी करण्यात आली. आता ही विद्यालये डी. टी. एड. (डिप्लोमा इन ट्रेनींग एज्युकेशन) या नावाने ओळखले जातात. हा अभ्यासक्रमपूर्ण करणार्‍या उमेदवारांना प्राथमिक शालेय स्तरावर शिक्षकाची नोकरी मिळू शकते. पूर्वी या शिक्षण संस्था अगदी मोजक्या म्हणजे जिल्ह्यात तीन-चार ठिकाणी असायच्या. त्यावेळी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार्‍या उमेदवारांची संख्याही मर्यादीत होती. त्या मानाने नविन निघणार्‍या शाळा आणि त्या ठिकाणी असणार्‍या शिक्षक या पदांच्या जागा मात्र भरपुर असायच्या. 
      मध्यंतरी शासकीय नोकर्‍यांमध्ये नविन उमेदवार भरती करणे बंद करण्यात आले होते. त्यामुळे डी. टी. एड. अभ्यासक्रमाला सोन्यासारखे दिवस आले होते. डी. टी. एड. झाले की, नौकरी पक्की अशीच लोकांची धारणा झाली होती. या कारणास्तव डी. टी. एड. ला प्रवेश मिळावा म्हणुन प्रचंड गर्दी होऊ लागली. त्यातुन प्रवेशासाठी देणगी घेण्याची प्रथा सुरु झाली अन् अनेक संस्थाचालक या देणग्यामुळे मालामाल झाले. तेव्हापासुन डी. टी. एड. कॉलेज म्हणजे जणु काही सोन्याचे अंडे देणारी कोंबडी म्हणुन त्याकडे पाहीले जाऊ लागले. त्याचबरोबर डी. टी. एड. कॉलेज काढणार्‍यांची गर्दी देखील वाढली. विना अनुदान या तत्वावर खिरापत वाटल्याप्रमाणे डी. टी. एड. कॉलेजच्या पाट्या गल्ली बोळात दिसु लागल्या.
    पण पाच-सात वर्षातच परिस्थिती बदलली. डी. टी. एड. झालेल्या उमेदवारांची संख्या वाढत गेली. तर दरवर्षी निघणार्‍या शिक्षकांच्या जागांची संख्या कमी होत गेली. साहजिक डी. टी. एड. ला प्रवेश घेणार्‍या उमेदवारांची संख्या रोडावली. एकेकाळी भरगच्च दिसणारी डी. टी. एड. कॉलेजेस आता ओस, रिकामी दिसु लागली आहेत. अशा या डी. टी. एड. कॉलेजची काही दिवसांपूर्वी शासनामार्फत तपासणी करण्यात आली. तेव्हा अनेक धक्कादायक बाबी निदर्शनास आल्या. सध्या कार्यरत असलेल्या डी. टी. एड. कॉलेजपैकी साठ टक्के संस्था आवश्यक असणार्‍या बाबी किंवा अशी अटी पूर्ण करण्यात असमर्थ असल्याचे दिसुन आले. कुठे संस्थेला इमारत नाही, कुठे पुरेसा शिक्षक वर्ग नाही. कुठे संस्थेत ग्रंथालय, प्रयोग शाळा, मैदान या सुविधा नाहित, तर कुठे प्रत्यक्षात वर्गच चालु नसल्याचे आढळून आले. यावरुन शिक्षक घडवणार्‍या या शिक्षण संस्थाची अवस्था आणि पात्रता ही किती खालावलेली आहे हे दिसुन आले. या संस्थेमधुन प्रशिक्षण घेतलेला शिक्षक म्हणुन एखाद्या शाळेवर त्याची नेमणुक झाली तर तो विद्यार्थ्यांना काय आणि कसे शिकवणार? ही भयानक अवस्था केवळ शिक्षकांचीच आहे, असे नाही. ती आजच्या प्राथमिक शिक्षणाची देखील अशीच भयानक परवड झाल्याचे एका तपासणी अहवालावरुन निदर्शनास आले आहे.
    पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणुन ओळखले जाते. पुणे शहरातील काही प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. तेव्हा हा भयानक प्रकार उघडकीस आला. या सर्वेक्षणानुसार सध्या प्राथमिक शिक्षणाचा दर्जा कमालीचा घसरला असुन आपल्या पाचवी आणि दुसरीतल्या विद्यार्थ्यांना साधी आणि सोपी वाक्ये लिहीता आणि वाचता येत नाहीत आणि त्याचा अर्थही कळत नाही, असे लक्षात आले आहे. इतकेच नव्हे तर पाचवीतल्या विद्यार्थ्यांना दुसरीसाठी असणारी बेरीज, वजाबाकी यावर आधारीत साधी गणीतेही येत नाहीत, असा या अहवालाचा निष्कर्ष आहे. सध्या शिक्षण क्षेत्र अनेक नविन प्रयोग, उच्च आणि तंत्रशिक्षणाची सुसंधी, तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांती आणि नविन संशोधन यामुळे ढवळुन निघत आहेत. एकीकडे शिक्षणाचे मोठे कारखाने ठरतील, अशी विद्यापीठे आणि महाविद्यालये, अनेक मजली अभियांत्रीकी महाविद्यालये, तंत्रशिक्षण संस्था, वैद्यकीय शिक्षण संस्था यांच्यामध्ये हजारो विद्यार्थी, शेकडो प्राध्यापक आणि लाखो रुपयांची फीस आणि डोनेशन अशी नविनच इंडस्ट्री विकसीत झाली आहे. त्यातच अशा शिक्षण क्षेत्रात पुरक उद्योग म्हणुन प्रत्येक शहरात डझनभर खाजगी ट्युशन क्लास आणि इन्स्टिट्युटचा मार्गदर्शनाचा धंदा जोरात चालु आहे. एकवेळ सरकारी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळणे सोपे आहे, पण अनेक वर्षे बोर्डात पहिला येण्याची परंपरा गाजवणार्‍या मुंबई, ठाणे, पुण्यातल्या खासगी क्लासमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कुंडलितील गृहमान अनुकुल असेल तरच प्रवेश मिळु शकतो. त्यामुळे हायस्कुल पासुन शाळा, ट्युशन, टि. व्ही. आणि इतर प्रलोभने लक्षात घेतली तर विद्यार्थ्यांना घरासाठी आणि गृहपाठ करायला वेळ मिळत नाही. त्यातुन गाईड आणि इंटरनेटच्या मुठ्ठीमध्ये सामावलेले जग याची व्याप्ती लक्षात घेतली, तर अभ्यासाठीच नव्हे पण परिक्षेत संभाव्य प्रश्‍न किंवा कॉपी करण्यासाठी चुटकीसरशी प्रश्‍नोत्तरे प्रिंट आउटसकट ताबडतोब मिळु शकतात. याच पठडीतील वरचा मजला असा असल्यामुक्षळे प्राथमिक शिक्षण हे अत्यंत दर्जाहीन नव्हे, पण जुन्या पिढीतील शाळेतील बाराखडी, तोंडी गणिते, काम आता संगणक आणि इंटरनेट करत आहे.
    पाटी पेन्सील गेली, अंकलिपीही नष्ट होत चालली, पाढे म्हणुन घेतले जात नाहित. आता तर कॅल्क्युलेटर आणि लॅपटॉप, टॅबलेट असल्याने आकडेमोड करायचे कष्ट घेतो कोण? तशातच आपले आई-वडिल यांना मान देणे, त्यांचे सांगणे ऐकणे हे मागासलेपणाचे लक्षण समजले जाते. आता शिक्षक वर्गालाही संतती नियमन, निवडणुका, मतदार याद्या, आधार कार्ड अशा शिक्षणाखेरीज अनेक उपाध्या असतात. त्याखेरीज साहित्य संमेलन, वेगवेगळ्या स्पर्धा, चर्चा सत्रांमध्ये शिक्षक हजेरी लावतात. अशी सर्व परिस्थिती असल्यामुळे आणि प्रत्येक पिरीयडमध्ये ४० ते ४५ मिनीटे त्यांच्या शिक्षणासाठी असला तरी मुलांच्या तक्रारी, मारामार्‍या त्यांच्या वह्या तपासणे यामुळे फारच थोडा वेळ मुलांना शिक्षण मिळते. या सर्व कारणांमुळे दर्जा घसरला असुन शिक्षण संस्थांमध्ये शिक्षणालाच उपक्रम देण्याचे धोरण ठेवले तरच ही परिस्थिती बदलु शकते.

 
Top