बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर)  -: मंत्रीपदाच्‍या रुपाने त्‍यांनी बार्शी तालुक्‍याच्‍या कार्यकर्त्‍यांच्‍या बहुमान केला आहे. मी कधीही जात, पात, धर्म, पक्ष याच्‍या पलीकडे काम केले आहे. त्‍यामुळेच आज या कार्यकर्त्‍यांच्‍या तिस-या पिढीनेही माझा स्विकार केला आहे. याच्‍यापेक्षा मला काहीच श्रेष्‍ठ वाटत नाही. मला टाटा, बिर्ला अथवा पंतप्रधान व्‍हायचे नाही. माझ्या माय भगिनीनी व 30 वर्षे जीवाचे रान करणारे सहकारी मित्र व वडिलधारी यांनी मला कुठलीही राजकीय परंपरा नसताना पदावर बसविले, असे मत सोलापूर जिल्‍ह्याचे नूतन पालकमंत्री ना. दिलीप सोपल यांनी व्‍यक्‍त केले.
    मंत्रीपदाची जबाबदारी स्विकारल्‍यानंतर ना. दिलीप सोपल बार्शीला पहिल्‍यांदाच आल्‍यावर बार्शीतील नागरिकांनी ना. सोपल यांचे भव्‍य मिरवणुकीसह जंगी स्‍वागत केले. रविवारी सकाळी आठपासून संध्‍याकाळी नऊपर्यंत आनंदोत्‍सवाची मिरणवुक सुरु होती. मिरवणुकीनंतर कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या सेल हॉलमध्‍ये कार्यकर्त्‍यांना मार्गदर्शन करण्‍यात आले. यावेळी दिपक आबा साळुंखे, आ. बबनदादा शिंदे, औद्योगिक वसाहतीचे चेअरमन सुधीर सोपल, राष्‍ट्रवादीचे  शहराध्‍यक्ष तानाजी मांगडे, मर्चंट असोसिएशनचे किशोर शहा, सुभाष गुळवे, नगराध्‍यक्ष कादरभाई तांबोळी, उपनगराध्‍यक्ष राहुल कोंढारे, आर्यन शुगर्सचे कार्यकारी संचालक विलास रेणके, अब्‍बास शेख, राजेंद्र मिरगणे, जि.प. सदस्‍य मकरंद निंबाळकर, नितीन मोरे, मल्लिनाथ गाडवे, अंबू नाना शिंदे, माजी नगराध्‍यक्ष योगेश सोपल, दिलीप गांधी, दगडू मांगडे, मंदाताई काळे, मंगलताई शेळवणे, सौ. लोखंडे, अमोल गुडे, अँड. विकास पाटील आदी मान्‍यवर उपस्थित होते.
    याप्रसंगी बोलताना ना. सोपल म्‍हणाले, न भूता न भविष्‍यती केलेले स्‍वागत हे कुणालाही हेवा वाटेल असे आहे, असे भाग्‍य मला लाभले त्‍याबद्दल मला खूप आनंद होत आहे हे केवळ तुमच्‍या कार्यकर्त्‍यांमुळे आहे. रविवारी सकाळी आठपासून कुर्डुवाडी-बार्शी रस्‍त्‍यावर सुरु असलेला सोहळा पाहिल्‍यावर पावसाही तुमचा हिरमुस करावा, असे वाटले नाही. परंतु पाऊस येणे ही गरज आहे. चांगला पाऊस पडल्‍याशिवाय मी कोणाचे फेटे स्विकारणार नाही. त्‍यामुळे हे पावसाचे संकट लवकर जावे, आपण सर्वजण शेतक-यांची लेकरे आहोत. पांडुरंग, भवानी व श्री भगवंत हे संकट लवकर दूर को, अशी प्रार्थना करतो. केंद्रीय कृषीमंत्री ना. शरद पवार व उपमुख्‍यमंत्री ना. अजित पवार यांनी माझ्यावर जबाबदारी टाकली आहे. यापूर्वीच अजितदादा यांनी माझे नाव मंत्रिमंडळात घेतले होते. परंतु त्‍यावेळी ते शक्‍य झाले नाही. माझ्यासाठी अनेकांनी गाठी भेटी घेतल्‍या. मी ही अनेकांच्‍या कामासाठी अनेकांच्‍या गाठीभेटी घेतल्‍यसा. अजितदादांचा फोन आला आणि मिटींगमधून निघुन शांतपणे पुण्‍याला गेला. 1967 साली सुंदरराव यांच्‍या हस्‍ते युवक कॉंग्रेसचे पत्र देण्‍यात आले. यानंतर 1976 साली उल्‍हासदादा पवार, शरदभाऊ सस्‍ते यांनी मला संधी दिली. माझा स्‍वभावच मुळचा राजकारणापेक्षा समाजकारणाचा असल्‍याने अनेक मित्रांची आज आठवण येते. यातील अनेकजण आपल्‍यात नाहीत. यात अनिल शेळके, किशोर पाटील, मोहनराव माने यांची आज उणीव भासते. आज ह्दयात न मावणारा आंनद आहे. तुमचे निरपेक्ष प्रेम असल्‍याने मला आणखी काही अपेक्षा नाही. हेच माझे भांडवल अन् ही माझी संपत्‍ती आहे. आयुष्‍यात पैसे मिळविण्‍यापेक्षा माणसे मिळवणे, जोडणे आणि जपणे महत्‍त्‍वाचे आहे. ज्‍यांनी आज बहुमान केला, प्रेम केले, ते आईने लेकरावर केलेल्‍या प्रेमासारखे आहे. हेच माझे भाग्‍य आणि संचित आहे. माझ्यावर टाकलेली जबाबदारी, तुमच्‍या आणि नेत्‍यांच्‍या अपेक्षा पूर्णत्‍वाला नेण्‍याचा शरीरात शेवटचा श्‍वास असेपर्यंत आटोकाट प्रयत्‍न करीन, असेही त्‍यांनी यावेळी म्‍हटले.
 
Top