बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: आगळगाव (ता. बार्शी) येथील भारतमाता बहुउद्देशीय संस्‍था संचलित मुकबधीर शाळेत महाराणा प्रतिष्‍ठानच्‍यावतीने महाराणा प्रताप जयंती साजरी करण्‍यात आली. महाराणा प्रताप यांच्‍या प्रतिमेचे पूजन सामाजिक कार्यकर्ते विक्रम सावळे व प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष विशाल पवार यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी येथील निवासी मुकबधिर विद्यार्थ्‍यांना प्रमुख पाहुण्‍यांच्‍या हस्‍ते शालेय साहित्‍य वाटप करण्‍यात आले. यावेळी विशाल वाणी, विलास चव्‍हाण, अमोल पवार व डी.आर. सोनटक्‍के, लखन शिंदे व मित्र मंडळ, कुमार माळी मित्र मंडळ, मौलाना आझाद विचारमंचाचे अध्‍यक्ष इस्‍माईल सौदागर व इतर ग्रामस्‍थ मोठ्या संख्‍येनी उपस्थित होते.
    याप्रसंगी बोलताना प्रमुख वक्‍ते विक्रम सावळे यांनी महाराणा प्रताप यांच्‍या राष्‍ट्रभक्‍ती व स्‍वाभिमानी बाण्‍याच्‍या महाराणा प्रतापांचा आदर्श राष्‍ट्र एकतेसाठी असल्‍याचे सांगत पाचशे वर्षानंतर आज देखील आजच्‍या तरुणांना त्‍यांच्‍या महान शौर्याचा विसर पडला ही खेदाची गोष्‍ट आहे. महाराणा प्रताप यांनी आयुष्‍यभर मोगल सैन्‍याबरोबर संघर्ष केला पण त्‍यांचे मांडकलीकत्‍व कधीही पत्‍करले नाही. महाराणा प्रतिष्‍ठानच्‍यावतीने घेण्‍यात आलेल्‍या कार्यक्रमाचे कौतुक करुन अध्‍यक्ष विशाल पवार व श्री सौख्‍यदाता गणेश मंडळाचे अध्‍यक्ष अमोल पवार यांच्‍या विधायक कामाचीही प्रशंसा केली आहे. डी.आर. सोनटक्‍के म्‍हणाले, स्‍वयंविकासाची प्रेरणा ख-या अर्थाने युवकांना विकसित करीत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिरगणे यांनी केले तर दळवी यांनी आभार मानले.  
 
Top