उस्मानाबाद -: येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयातून निरीक्षकाच्या कपाटातील रिव्हॉल्व्हर व 44 काडतूस चोरट्याने लंपास केल्‍याची घटना सोमवार रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असून या घटनेची पोलिसात नोंद झाली आहे.
    राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय शासकीय मध्यवर्ती इमारतीमध्ये दुसर्‍या मजल्यावर कार्यालय आहे. उत्पादन शुल्क निरीक्षक रमेश नामदेव वाघमारे यांनी आपले सरकारी रिव्हॉल्व्हर कार्यालयातील कपाटात पिशवीमध्ये ठेवले होते. रविवारी सकाळी 9 ते सोमवारी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान चोरट्याने कार्यालयाच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तेथील नेमक्या रिव्हॉलव्हर ठेवलेल्या कपाटाचाच दरवाजा तोडण्यात आला. कपाटातील पिशवीत ठेवण्यात आलेले 384 बुलेटचे 38 एमएमचे (क्र. 793186) रिव्हॉल्व्हर व 44 काडतूस घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. याप्रकरणी वाघमारे यांच्या फिर्यादीवरुन येथील शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक सुरेश घाडगे हे करीत आहेत.
 
Top