नळदुर्ग -: हरित क्रांतीचे प्रणेते तथा मुख्‍यमंत्री व बंजारा महानायक वसंतराव नाईक यांच्‍या जन्‍मशताब्‍दी वर्षानिमित्‍त राष्‍ट्रीय बंजारा परिषदेच्‍यावतीने श्री संत धावजी नाईक द्वितीय पुण्‍यतिथी उत्‍सव, बंजारा साहित्‍य परिषद, बंजारा ग्रंथ दिंडी, बंजारा स्‍नेहमेळावा, सन्‍मान व प्रकाशन सोहळा डिग्‍गेवाडी (ता. अक्‍कलकोट) येथील शांतीस्‍थळी दि. 6 ते 7 जून असे दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे.
    या बंजारा साहित्‍य संमेलनात देशातील 265 संशोधक, लेखक, साहित्यिकांचा पुरस्‍कार व मानपत्राने सन्‍मान करण्‍यात येणार आहे. मिरवणूक, साहित्‍य दिंडी, आभूषण, पुस्‍तके प्रदर्शन व विक्री, चाळीसहून अधिक नवीन पुस्‍तके, सीडीचे प्रकाशन, श्रीमती रत्‍नाबाई राठोड यांची साखर तुला, प्रा. मोतीराज राठोड यांची ग्रंथ तुला, ज्‍येष्‍ठ बंजारा समाजसेवक चंद्राम चव्‍हाण गुरुजी यांचा जीवन गौरव पुरस्‍काराने सन्‍मान करण्‍यात येणार आहे. त्‍याचबरोबर सर्व साहित्यिकांची बंजारा थाटात शाही भव्‍य मिरवणूक काढण्‍यात येणार आहे. दोन दिवसीय आयोजित कार्यक्रम पुढीलप्रमाणे होणार आहेत.
    गुरुवार दि. 6 जून रोजी सायंकाळी सहा वाजता 'श्री' चे आगमन होईल, आठ वाजता श्री हमुलाल महाराज महाभोग, रात्री साडे आठ वाजता महाप्रसाद, रात्री दहा वाजता भजन संध्‍या व सांस्‍कृतिक कार्यक्रम होईल. त्‍यानंतर जागरण व साहित्‍य विचारमंथनाचा कार्यक्रम होणार आहे. शुक्रवार दि. 7 जून रोजी सकाळी सात वाजता अभिषेक व पूजा, आठ वाजता भजन व सांस्‍कृतिक कार्यक्रम, साडे नऊ वाजता श्री हमुलाल महाराज महाभोग, दहा वाजता ग्रंथ दिंडी शोभा यात्रेचा शुभारंभ होईल, अकरा वाजता श्री धावजीबापू महाभोग व पुष्‍पांजली, साडे अकरा वाजता बंजारा साहित्‍य संमेलनाचे उदघाटन होणार आहे. तर पुरस्‍कार वितरण, सन्‍मान सोहळा, प्रकाशन सोहळा कार्यक्रम होणार आहे. दुपारी अडीच वाजता चर्चासत्र, साडे तीन वाजता बंजारा सांस्‍कृतिक कार्यक्रम, पाच वाजता कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
    तरी बंजारा बांधवानी जास्‍तीत जास्‍त संख्‍येनी कार्यक्रमास उपस्थित राहून लाभ घेण्‍याचे आवाहन राष्‍ट्रीय बंजारा परिषदेचे अध्‍यक्ष किसनराव राठोड यांनी केले आहे.
 
Top