बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: पहिल्याच पावसात श्री भगवान महावीर नगरपालिका शाळा क्रमांक दोनच्या वर्गखोल्यासमोरील व्हरांड्याचा छत कोसळल्याने इमारतीचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. अनेक वर्षापासून असलेल्या धोकादायक इमारतींचा बांधकाम विभागाच्या अभियंत्यांकडून गेलेलचा चुकीचा अंदाज अनेक जीवांच्या मुळावर उठत आहे. सुदैवाने सद्यस्थितीत शाळेला सुट्टी असल्याने तसेच रात्रीच्या वेळी घटना घडल्याने सदरच्या दुर्घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही परंतु सदरच्या ठिकाणी असलेल्या धोकादायक बांधकाम उतरण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
बार्शी नगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळामार्फत सुरु असलेल्या अनेक शाळांच्या इमारतींमध्ये भौतिक सुविधांचा अभाव, इमारतींची दुरावस्था, शाळेतील विद्यार्थ्यांची घटलेली संख्या, परिसरातील अस्वच्छता, दूषित वातावरण, वरिष्ठांचे दूर्लक्ष व यावर काढलेल्या रामबाण उपाय म्हणून सामाजिक संस्थाना देण्यात येणारे पालकत्व हे देखील वादाच्या भोव-यातील आहे.श्री भगवान महावीर नगरपालिका शाळा क्रमांक दोनमध्ये पहिली ते सहावीचे वर्ग सुरु आहेत. याच इमारतीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगरपालिका शाळा क्रमांक दहामध्ये समाविष्ट केली असून त्याचे इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग सुरु आहेत. शाळा क्रमांक दोनमधील एकूण 63 तर शाळा क्रमांक दहामधील 30 विद्यार्थी या जागी शिक्षण घेत असून शाळा क्रमांक दोनचे तीन शिक्षक, शाळा क्र. दहाचे दोन शिक्षक सदरच्या ठिकाणी नियुक्त आहेत.
सदरच्या शाळेचे बांधकाम अत्यंत जुने असून बाहेरील व्हरांड्यात लाकडी छोट्या खांबावर लोखंडी अँगल व त्यामध्ये फरशी टाकून विटा व सिमेंटचे बांधकाम केले आहे. खाली आधारला देण्यात आलेले लाकडी खांब कुजून गेल्याने वरच्या असलेल्या बांधकामाचा ताबा सुटलेला आहे. कोणत्याही क्षणी सदरचे बांधकाम खाली कोसळण्याची शक्यता असल्याने तातडीने खाली उतरुन घेणे गरजेचे आहे.
सदरच्या घटनेनंतर कॉंग्रेसचे नगरसेवक महेदीमियॉं लांडगे यांनी मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांना सदरच्या घटनेची तातडीने दखल घेण्याची लेखी विनंती केली आहे. यानंतर शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी चिलवंत, पर्यवेक्षक संजय पाटील, बांधकाम विभागाचे दिलीप खोडके, उपमुख्याधिकारी म्हेत्रे यांनी घटनास्थळी भेट दिली.