तुळजापूर -: तुळजापूरच्या नगराध्यक्षा अर्चना गंगणे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा प्रभारी जिल्हाधिकारी ज्ञानोबा फुलारी यांच्याकडे सादर केला आहे. निवडणुकी पूर्वीच्या समझोत्यानुसार गंगणे यांनी राजीनामा दिल्याने विद्या दिलीप गंगणे यांचा नगराध्यक्षपदाचा मार्ग सुकर झाला आहे.
    नगरपरिषदेच्‍या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादीने सर्व 19 जागा जिंकून इतिहास घडविला होता. या निवडणुकीपूर्वी झालेल्या समझोत्यानुसार सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असलेल्या अध्यक्षपदावर सुरुवातीच्या दीड वर्षासाठी अर्चना गंगणे व त्यानंतर एक वर्षासाठी विद्या दिलीप गंगणे अशी अध्यक्षपदाची विभागणी ठरली होती. त्यानुसार विद्यमान नगराध्यक्षा अर्चना गंगणे यांनी शनिवारी प्रभारी जिल्हाधिकारी ज्ञानोबा फुलारी यांच्याकडे राजीनामा सादर केला. याप्रसंगी नगरसेवक पंडितराव जगदाळे, माजी नगरसेवक विनोद गंगणे यांची उपस्थिती होती.
    तुळजापूर नगरपरिषदेत अध्यक्षपदासह उपाध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांची सर्वांना संधी मिळण्यासाठी विभागणी करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी वर्षाला एकाला संधी मिळणार आहे. 5 वर्षांच्या कालावधीत 5 उपाध्यक्ष फिक्स करण्यात आले आहेत तर स्वीकृत सदस्यपदाची मुदत 1 वर्षाची करण्यात आली असून, 5 वर्षांत 10 जणांची या पदावर वर्णी लागणार आहे.
 
Top