फोंडाघाट -: पणजीहून पुणेकडे जाणा-या एशियाड आराम बसला अचानक आग लागल्‍याने संपूर्ण गाडीचा केवळ सात मिनिटात कोळसा झाला. एसटी चालकाच्‍या सतर्कतेमुळे प्रवाशांना वाचविण्‍यात यश आले असून तातडीने डिझेल पाईप तोडल्‍यामुळे मोठी दुर्घटना टळली. ही घटना मंगळवारी दुपारी तीन वाजण्‍याच्‍या सुमारास फोंडाघाटापासून सहा किलोमीटर वळणावर मुडाचाव्‍हाळ येथे घडली. यावेळी एसटीतून 32 प्रवासी प्रवास करत होते. प्रवाशांना वाचविण्‍यात यश आले असले तरी काही प्रवाशांचे सामान भस्‍मसात झाले. या अपघातात एसटी बस भस्‍मसात झाल्‍याने लाखोंची हानी झाली आहे.
    पणजीवरुन चिंचवड-पुणे येथे जाणारी चिंचवड आगाराची एशियाड एसटी बस क्रमांक एमएच 06 एस 8380 ही बस फोंडाघाट येथून कोल्‍हापूरकडे जाण्‍यासाठी अडीच वाजता रवाना झाली. फोंडाघाटातून जात असताना पहिल्‍याच वळणावर मुडाचाव्‍हाळ येथे गाडीच्‍या समोरील भागातून अचानक धूर येऊ लागला आणि काही मिनिटांतच गाडी पूर्ण भस्‍मसात झाली. हा अपघात मंगळवारी तीन वाजण्‍याच्‍या दरम्‍यान घडला. गाडीतून धूर येतो आहे, हे लक्षात येताच गाडी जागीच थांबवत सर्वांनी तातडीने उतरावे, असे चालकाने प्रसंगावधन राखून आरडाओरड केली. कारवीर येथील चालक अरुण म्‍हादळेकर आणि गाडीचे वाहक शब्‍बीर पैलवान (कोल्‍हापूर) यांनी प्रवाशाना उतरुन घेतानाच चालकाने गाडीचे मुख्‍य बटन बंद केले. प्रवासी जसे होते तसे उतरविण्‍यासाठी याच गाडीतून प्रवास करणा-या हैद्राबाद येथील अभियांत्रिकी    कॉलेजच्‍या मुलांनी पुढाकार घेतला. मात्र, पुढच्‍या पाचच मिनटात गाडी पूर्ण धुराने भरुन गेली. कोणाला काय होत आहे, हे समजत नसल्‍याने सर्वजण पळत सुटले. आरडाओरड, आक्रोश आणि पळापळाच्‍या आवाजाने घाटात गडबड उडाली होती. दरम्‍यान, चालक आणि वाहकाने तसेच काही प्रवाशानी गाडी संपूर्ण पेटल्‍याचे लक्षात येताच पुन्‍हा माघारी परतत आत कोणी प्रवासी अडकला तर नाही ना, याची चाचपणी केली. पेटत्‍या गाडीवर माती मारुन विझविण्‍याचा प्रयत्‍न केला. चालकाने डिझेलचा पाईप तोडून टाकी सुरक्षित केली.
शॉर्टसर्किटमुळे लागली आग
एसटीच्‍या पुढील भागात असणा-या अल्‍टरनेटर आणि रेडीएटरच्‍यामध्‍ये झालेल्‍या शॉटसर्किटमुळे गाडीच्‍या वायरिंगने पहिल्‍यांदा पेट घेतला आणि छतावर असलेल्‍या विजेच्‍या तारा जळून भस्‍मसात झाल्‍या. नव्‍या रचनेत आरामदायी प्रवासासाठी फोमचा वापर नव्‍या गाड्यांमध्‍ये करण्‍यात आला आहे. यामुळे गाडीत आग आणखीनच भडकली. ही नवीन गाडी पणजीवरुन माघारी येत असताना अपघातग्रस्‍त झाली. या दरम्‍यान गाडीत कोणताही तांत्रिक दोष नव्‍हता, असे चालकाने सांगितले. प्रवाशांनी तसेच चालकांनी या घटनेची माहिती पोलीस आणि एसटी स्‍थानकात दिल्‍यानंतर प्रवाशांना पुढील प्रवासासाठी गाडी सोडण्‍यात आली.
 
Top